{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

वाय रिव्ह्यू – समाजातील घृणास्पद घटनांवर थेट भाष्य करणारा मुक्ता बर्वेचा थरार

Release Date: 24 Jun 2022 / Rated: U/A / 02hr 38min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

डॉ अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित या चित्रपटात नंदू माधव नकारात्मक भूमिकेत आहेत.

लेखक-दिग्दर्शक डॉ अजित सूर्यकांत वाडीकर यांचा वाय हा पहिलाच चित्रपट आहे. योगायोग म्हणजे यशराज फिल्म्सचा जयेशभाई जोरदार (२०२२) काही आठवड्या आधीच प्रदर्शित झालाय. दोन्ही चित्रपटांमध्ये एकाच सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्यात आलंय, मात्र चित्रपटांची कथा, मांडणी आणि शैली पूर्णपणे वेगळी आहे.

वायची गोष्ट २००७ मध्ये सुरु होते. महाराष्ट्रातल्या विश्रामपूर गावामध्ये रेडिओलॉजिस्ट पुरुषोत्तम गायकवाड (नंदू माधव) एक दवाखाना चालवतात. वैद्यकीय सेवेच्या शुभ्र छत्राखाली गायकवाड बेकायदेशीर लिंग निदान चाचणी करत असतात आणि जर गर्भ मुलगी असेल तर गर्भपात सुद्धा. मुलगाच हवा असणाऱ्या जोडप्यांची त्यांच्या इस्पितळात नेहमी हजेरी असते.

डॉ आरती देशमुख (मुक्ता बर्वे) शासकीय अधिकारी आहे, जिच्यावर प्रि-कन्सेप्शन अँड प्रि-नॅटल डायग्नोस्टिक टेकनिक (पीसीपीएनडीटी) ऍक्ट प्रमाणे वैद्यकीय सेवेतील लोक काम करत आहेत कि नाही हे बघायची जबाबदारी आहे. मुलींच्या गर्भपाताच्या समस्येला आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. तिला डॉ पुरुषोत्तम यांच्या दवाखान्यात काही तरी गडबड जाणवते, पण तिला काहीही सिद्ध करता येत नाहीय. मात्र तरीही ती हार मानणाऱ्यातली नाहीय.

वाय मध्ये एक असा गंभीर सामाजिक प्रश्न हाताळला आहे ज्याचे लोण ग्रामीण भागाच्या बाहेरही तितकेच पसरलेले आहे आणि तिथेही कायद्याची कुठलीही भीती या लोकांमध्ये जाणवत नाही. ज्या सहजतेने या गोष्टी घडत असतात, हे कदाचित काही लोकांना अस्वस्थ करू शकेल. मात्र यामुळे चित्रपट अधिक वास्तविकतेने आपला मुद्दा मांडतो. दिग्दर्शक वाडीकर स्वतःच डॉक्टर म्हणून कार्यरत असल्याने चित्रपटामध्ये डॉक्टरी व्यवहारातील गोष्टी वास्तविकतेमध्ये जशा असतात, तशा दिसतात.

नंदू माधव वाय मध्ये

वायची गोष्ट थेट आहे, मात्र त्याच्या प्रस्तुतीमध्ये कल्पकता हि उत्तमरीत्या वापरली आहे. कथेची मांडणी नॉन लिनियर पद्धतीने मांडताना चित्रपटाचा थरार सुद्धा लक्षात ठेवण्यात आलाय. चित्रपटाची सुरुवात लागोपाठ घडणाऱ्या विचित्र घटनांनी होते. पुढे चित्रपटात फ्लॅशबॅक पद्धतीने एक एक घटना आणि पर्यायाने कथा उलगडत जाते आणि सोबतच यातील पात्रांचा हेतू सुद्धा स्पष्ट होतो. हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडून जातो.

थरार नाट्यांमध्ये विचित्र कॅमेरावर्क आणि भडक पार्श्वसंगीताचा ओव्हरडोज होण्याची शक्यता असते. मात्र इथे हा धोका टळलाय. राकेश के भिलारे यांची सिनेमॅटोग्राफी सफाईदार आहे. पराग छाब्रा यांचं मूळ संगीत उत्तमरीत्या वापरलं आहे.

बर्वेची उशिराने होणारी एंट्री सुद्धा तुम्हाला चकित करते. पुढे पूर्ण वेळ ती आपलं वर्चस्व सिद्ध करत जाते. बेकायदेशीर वागणाऱ्या प्रत्येकास उघडकीस आणण्याची तिची जिद्द अगदी खरी वाटते. तिच्यासाठी सहजच सहानुभूती जागृत होते आणि ती यशस्वी व्हावी हे आपल्याला सुद्धा मनोमन वाटू लागतं.

हरिश्चंद्राची फॅक्टरी (२०१०) मध्ये दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत अजरामर काम करणारे नंदू माधव इथे नकारात्मक भूमिकेत आहेत आणि अतिशय निर्दयी अशा पात्रात ते दिसतात. भूमिकेचा तोल ढळू न देता ज्या ताकदीने त्यांनी हि नकारात्मक भूमिका साकारली आहे, त्याला तोड नाही.

सुहास शिरसाट यांचा नकारात्मक मुन्ना भन्नाट आहे. रानबाजार नंतर प्राजक्ता माळी पुन्हा एकदा आपल्या प्रतिमेच्या विरुद्ध भूमिकेत दिसतात आणि जास्त लांबी नसलेल्या भूमिकेत सुद्धा त्या तितक्याच लक्षात राहतात. ओंकार गोवर्धन, संदीप पाठक, रोहित कोकाटे आणि बालकलाकार काव्या पाठक सुद्धा साहाय्यक भूमिकेत उत्तम आहेत.

वायच्या काही नकारात्मक बाजू सुद्धा आहेत. उत्तरार्धात काही दृश्यांवर प्रश्न उपस्थित होतात, तसेच फोटोग्राफरचं उपकथानक सुद्धा तितकंसं पटणारं नाही. मात्र या चित्रपटाला उत्तम चित्रपटाच्या श्रेणीत जाण्यापासून रोखतो तो या चित्रपटाचा गोंधळलेला शेवट. ज्यावेळेस एंड क्रेडिट येतात, तेव्हा चित्रपट संपलाय यावर विश्वास ठेवावंसं वाटत नाही.

 

Related topics

You might also like