{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

वेगळी वाट रिव्ह्यू – शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दर्शविण्याचा प्रामाणिक प्रयत्न, उत्तरार्ध मात्र कमकुवत

Release Date: 07 Feb 2020 / Rated: U / 01hr 54min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Suyog Zore

बाप-मुलीच्या नात्याला दाखवत हा चित्रपट कौटुंबिक वळणावर सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचं प्रभावी चित्रण इथे होत नाही.

राम (शरद जाधव) एक शेतकरी आहे ज्याने सावकाराकडे आपली जमीन गहाण ठेवली आहे. गारपिटीमुळे पिकांची झालेली नुकसान भरपाई अजून सरकार कडून मिळालेली नाही. यातच सावकाराला त्याचे पैसे ४८ तासात परत हवे आहेत.

कुठलाही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे राम देशमुख दाम्पत्याकडे (योगेश सोमण आणि गीतांजली कुलकर्णी) जातो. हे दाम्पत्य शिक्षक आहेत. ते रामचं कर्ज फेडण्याची तयारी दाखवतात, मात्र त्याची मुलगी सोनू (अनया पाठक) त्यांच्याकडे राहावी, अशी त्यांची अट आहे.

सोनू वर्गात पहिली येणारी हुशार मुलगी आहे. देशमुखांसोबत सगळ्यांची ती लाडकी आहे. एक दिवस सोनू एक कल्पना घेऊन येते ज्यामुळे तिच्या वडिलांचं आर्थिक संकट टळू शकेल, पण तो पर्यंत फार उशीर झालेला असेल का? तिची कल्पना त्यांना संकटातून बाहेर काढू शकेल कि त्यांचा प्रश्न अधिक बिकट करेल?

शेतकऱ्यांच्या कर्जांवरचे विषय आता मराठी चित्रपटाला नवीन नाहीत, परंतु वेगळी वाट तरीही तुम्हाला शेवटपर्यंत चित्रपटाशी बांधून ठेवतो. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडून चित्रपट बाप-लेकीच्या नात्याकडे वळू लागतो, तिथे चित्रपट आपली पकड सैल करतो.

चित्रपटाची सुरुवात उत्तम होते आणि शरद जाधव आणि नीना दोंदे यांचा अभिनय याचं मुख्य कारण म्हणता येईल. जाधव यांनी हतबल शेतकरी आणि आपल्या कुटुंबाला आवश्यक गोष्टी सुद्धा न देऊ शकणारा बाप उत्तम रंगवला आहे. कुठेही अधिकचा अभिनिवेश न आणता त्यांनी हे पात्र उत्तम साकारलय. जाधव यांचा अभिनय ह्या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू आहे.

रामच्या बायकोची भूमिका करणाऱ्या दोंदे यांचा अभिनय सुद्धा वाखाणण्या योग्य आहे. रामला तिचा नेहमी आधार असतो. रामने सगळ्या आशा सोडल्यानंतर सुद्धा ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी असते आणि त्याला आधार देत असते. एक चांगली बायको आणि त्याच वेळेस एक अशी आई जिला आपल्या मुलीला वेगळं होताना पाहणं अनावर होतंय, अशा दोन्ही पातळीवर त्यांनी उत्तम समतोल साधला आहे.

बाल कलाकार अनया पाठकचा प्रामाणिक प्रयत्न लक्षात येतो, मात्र भावनिक दृश्यांमध्ये ती फारशी चमक दाखवू शकलेली नाही. गीतांजली कुलकर्णी आणि योगेश सोमण यांना फक्त काही दृश्यांसाठी वापरले आहे, जिथे त्यांचा कस लागेल असं काहीही करण्यासारखं त्यांना मिळालेलं नाही, मात्र तरीही उपलब्ध परिस्थितीत त्यांनी आपले काम चोख केले आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लेखक अच्युत नारायण यांनी उत्तम कथा रचली आहे. बाप-लेकीच्या नात्यातले काही हळुवार प्रसंग सुद्धा त्यांनी कुशलतेने गुंफले आहेत.

चित्रपट बऱ्याच अंशी तुम्हाला गुंतवून ठेवतो, पण उत्तरार्धात चित्रपटाचा विषय बदलून एका बापाची आपल्या मुलीपासून कायमचं दूर होण्याची वेदना आणि ते थांबवण्यासाठी त्याची धडपड यावर लक्ष केंद्रित होतं. थोड्या वेळासाठी या भावनिक क्षणांमध्ये आपण सुद्धा गुंततो, मात्र नंतर परत परत त्याच भावनिक स्तरावर चित्रपट येतो आणि त्यातून आपण सहजच बाहेर पडतो. एकदा चित्रपटाचा संघर्षाचा मुद्दा प्रस्थापित झाला कि त्याला अधिक रोचक कसं बनवावं याबाबत दिग्दर्शक साशंक आहेत, असं दिसतं.

लेखक-दिग्दर्शक अच्युत नारायण यांचा हा पहिला चित्रपट असून सुद्धा चित्रपटाच्या क्राफ्टवर त्यांची चांगली पकड आहे हे लक्षात येतं. उगाच प्रचारकी किंवा नाटकीय न होऊ देता त्यांनी वास्तववादी चित्रणावर भर दिलाय. पण मुख्य थीम पासून वेगळं होऊन ते जेव्हा भावनिक स्तरावर चित्रपटाला नेतात, तिथेच त्यांची गोची झाली आहे हे हि लक्षात येतं.

शकील खान यांची सिनेमॅटोग्राफी सुद्धा चित्रपटाची जमेची बाजू आहे. अत्यंत लक्षवेधी जरी नसले तरी त्या भागातील उत्तम चित्रण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. ओसाड जमीन, तालुक्याचा बाजार, मोठे सुनसान रस्ते असे महाराष्ट्रातील दुर्गम भागाचे बारकाईने केलेले चित्रण आपले लक्ष वेधून घेते.

चित्रपटाचं संगीत मात्र कमकुवत आहे. उगाच बरीच गाणी चित्रपटात वापरण्यात आली आहेत. गाणं जरी पार्श्वभागी वाजत असली तरी त्यामुळे चित्रपटाचा वेग मंदावतो.

थोडक्यात, वेगळी वाट हा अच्युत नारायण यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि जर तुम्हाला गंभीर चित्रपटांची आवड असेल तर तुम्ही हा चित्रपट जरूर बघावा.

 

Related topics

You might also like