{ Page-Title / Story-Title }

Review English

व्ही शांताराम – द पायोनियरिंग स्पिरिट रिव्ह्यू — लोकप्रिय दिग्दर्शकावर माहितीपूर्ण डॉक्युमेंट्री

Release Date: 2010 / 42min

Read in: English


Cinestaan Rating

  • Direction:
  • Music:

Keyur Seta

संजीत नार्वेकर लिखित-दिग्दर्शित ४१ मिनिटांच्या या माहितीपटात दिवंगत व्ही शांताराम यांच्याबद्दल काही मजेदार गोष्टी सांगितलेल्या आहेत.

धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटाचे जनक असे संबोधण्यात येते. त्यांच्यामुळे चित्रपटक्षेत्र भारतात रुजू लागले. फाळके यांची परंपरा पुढे नेण्याचं काम आणि भारतीय चित्रपटक्षेत्राला नव्या उंचीवर जर कुणी केलं असेल तर ते शांताराम राजाराम वनकुद्रे उर्फ व्ही शांताराम.

फिल्म्स डिव्हिजनच्या व्ही शांताराम – द पायोनियरिंग स्पिरिट या माहितीपटात त्यांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे. संजीत नार्वेकर लिखित-दिग्दर्शित या ४१ मिनिटांच्या माहितीपटात त्यांच्या आयुष्यातील काही मजेदार गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

शांताराम यांचा पहिल्यांदा चित्रपटांशी संबंध आला जेव्हा त्यांचे मावस भाऊ, गुरु आणि प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंढारकर त्यांना महाराष्ट्र फिल्म कंपनीत प्रसिद्ध चित्रपटकार बाबुराव पेंटर यांच्याकडे घेऊन गेले. पुढे त्यांनी बालगंधर्वांच्या सानिध्यात नाटकाचे तंत्र शिकले.

शांताराम यांनी रेल्वेमध्ये सुद्धा काही काळ काम केले, पण चित्रपटात त्यांची रुची अधिक असल्याने त्यांनी ते काम सोडले. त्यांनी पेंटर यांच्याकडे काम करायला सुरुवात केली आणि सुरुवातीला त्यांनी वेगवेगळ्या विभागात कामे केली. सोबतच चित्रपटात छोट्या भूमिका सुद्धा केल्या. याच दरम्यान त्यांनी एडिटिंग शिकले आणि ते पहिले स्पेशलाइज्ड किंवा शिक्षित एडिटर बनले. लवकरच त्यांनी नेताजी पालकर (१९२७) च्या रूपात पहिला चित्रपट दिग्दर्शित केला.

यानंतर शांताराम यांनी आयुष्यात परत कधीच मागे वळून पाहिले नाही. अयोध्येचा राजा (१९३२, पहिला भारतीय द्विभाषिक चित्रपट), अमर ज्योती (१९३६), माणूस (१९३९), शेजारी (१९४१), डॉ कोटणीस की अमर कहानी (१९४६), झनक झनक पायल बाजे (१९५५), दो आँखे बारह हाथ (१९५७), नवरंग (१९5९), पिंजरा (१९७२) इत्यादी चित्रपटांनी त्यांना अजरामर केले.

या माहितीपटात शांताराम यांचा संपूर्ण जीवन प्रवास जलद गतीने दाखवण्यात आला आहे. काही माहितीपट निरस वाटतात, मात्र हा एका बायोपिक सारखा रंजक झालाय. शांताराम यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या क्षणांना हा माहितीपट स्पर्श करतो आणि त्यांना पारदर्शी पद्धतीने मांडतो .

बी आर चोप्रांच्या महाभारत मालिकेतील प्रसिद्ध आवाज देणारे हरीश भिमानी यांच्या आवाजात या माहितीपटाचे निवेदन करण्यात आले आहे, त्यामुळे ते अधिकच लक्षवेधी ठरतं.

दुर्गा खोटे, दिग्दर्शक राम गबाळे, चित्रपट इतिहासकार बापू वाटवे, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि डॉ श्रीराम लागू असे चित्रपट क्षेत्रातील मोठी नावं या माहितीपटात प्रत्यक्ष दिसतात, त्यांचा प्रत्यक्ष सहवास किंवा शांताराम यांच्याविषयी त्यांचा असलेला अभ्यास यातून शांताराम अधिक कळत जातात.

व्ही शांताराम – द पायोनियरिंग स्पिरिट मध्ये शांताराम यांच्याविषयी काही अशा गोष्टी माहिती होतात ज्या ऐकून तुम्ही चकित व्हाल. मोती गिडवाणीचा किसान कन्या (१९३७) हा पहिला भारतीय रंगीत चित्रपट म्हणून ओळखला जातो. पण या चित्रपटाच्या चार वर्ष आधी शांताराम यांनी सैरंध्री या नावाने पहिला रंगीत चित्रपट बनवला होता. दुर्दैवाने चित्रपट चांगला बानू शकला नाही आणि हा चित्रपट डब्यात बंद करण्यात आला.

दो आँखे बारह हाथ या चित्रपटातील 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गाणे माहितीपटाच्या शेवटी दाखवले गेलंय, जे अत्यंत संयुक्तिक वाटतं.

व्ही शांताराम – द पायोनियरिंग स्पिरिट फिल्म्स डिव्हिजनच्या मास्टर्स कॉन्स्टलेशन या ऑनलाईन फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आला होता. ९ ते ११ जुलै २०२१ या काळात हा महोत्सव भरवण्यात आला. माहितीपट येथे पहा.

 

Related topics

YouTube

You might also like