Shriram Iyengar
मुंबई, 10 Jan 2020 7:30 IST
अजय देवगण आणि सैफ अली खान यांनी हा संपूर्ण चित्रपट व्यापून टाकलेला आहे, तरी सुद्धा चित्रपटाचे पार्श्वसंगीत, व्हिज्युअल इफेक्टस आणि साहस दृश्यं चित्रपटाच्या तांत्रिक वर्चस्वाचे दर्शन समर्थपणे घडवतात.
"तुम्हारे जज्बात मिट्टी से जुडे हैं, और मेरी अकल पानी से," उदयभान राठोड (सैफ अली खान) तानाजी मालुसरे (अजय देवगण) ला छळताना म्हणतो. या वाक्यातून ओम राऊत यांच्या चित्रपटाचे संपूर्ण सार कळून येते. चित्रपटात तानाजी मालुसरेंची गोष्ट, किंवा आख्यायिका म्हणूया, सांगितली गेली आहे, ज्यात त्यांनी आपल्या राजासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन अशक्य असा कोंढाणा किल्ला जिंकून दिला.
चित्रपटाच्या सुरुवातीला लहान तानाजी आपल्या वडिलांना मुघलांशी लढताना आणि प्राण गमावताना बघतो. लवकरच गोष्ट पुढे सरकते आणि शिवाजी राजेंचा चढता काळ आणि महाराष्ट्रात सर्वत्र भगवा फडकण्याचा संघर्ष उभा राहतो.
पण या योजनेत अडथळा निर्माण होतो तो जय सिंहमुळे. औरंगजेब जय सिंहला पाठवून शिवाजीं सोबत पुरंदरचा करार करतात, ज्यात मराठ्यांचे २३ किल्ले मुघलांना दिले जातात. दख्खनचा कोंढाणा हा त्यातला महत्वाचा किल्ला.
या अपमानाचा बदला तर घ्यायचाय. आग्र्याहून शिवाजींच्या सुटकेनंतर या किल्याला परत मिळवण्याची योजना आखली जाते. त्यांचा सर्वात विश्वस्त मावळा आपल्या मुलाच्या लग्नात व्यस्त असल्यामुळे शिवाजी (शरद केळकर) स्वतः या युद्धात जायचं ठरवतात. पण तानाजीला हि मोहिम हातची जाऊ द्यायची नसते आणि ठरतं कि आधी लगीन कोंढण्याचं, मग रायबाचं म्हणजे त्याच्या मुलाचं.
ओम राऊत आणि प्रकाश कापडिया यांनी एक सुंदर गोष्ट मांडली आहे, जिचा वेग उत्तम आहे आणि अनेक भावनिक क्षणांनी भरलेली आहे. स्क्रीनप्ले तपशीलवार लिहिला गेलाय आणि यात अनेक व्यक्तिरेखा, प्रसंग आणि विविध अँगल्स वापरले गेलेत. प्रत्येक गोष्ट हुशारीने मांडली गेली आहे आणि प्रत्येक प्रसंग शेवटच्या युद्धाकडे आपल्याला घेऊन जातो. गुप्त मार्ग, किल्यांच्या कडा चढणे, शेवटचं युद्ध अगदी सुबकतेने रचलं गेलंय आणि शेवटपर्यंत तुमची उत्सुकता कायम राहते.
राऊत यांनी भावनिक क्षणांनी चित्रपटाचा भार सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे, पण चित्रपटात काही व्यक्तिरेखांना ज्या पद्धतीने दाखवलं गेलं आहे, ते खटकतं. बहुतेक स्त्री पात्र, खासकरून काजोल आणि नेहा शर्मा यांनी निभावलेली पात्रं, निव्वळ आवरणं आहेत. आपल्या नवऱ्याच्या बाजूने उभं राहणं किंवा खलनायकाच्या हातात सापडलेली हतबल स्त्री याशिवाय त्यांना फारसं काही करण्यासारखं नाही.
याशिवाय अशा काही पुरुष व्यक्तिरेखा सुद्धा आहेत ज्या चित्रपटातून मध्येच गायब होतात. अजिंक्य देव यांनी साकारलेलं पिसाळ हे खजिनदाराचं पात्र मराठ्यांचं साम्राज्य मिळवण्याची महत्वकांक्षा बाळगून असतं, पण मध्यंतरानंतर ते अचानक नाहीसं होतं.
या काही दोषांकडे दुर्लक्ष करता चित्रपट किल्ला परत मिळवण्याच्या या लढाईचं रंजक चित्र उभं करतो, जो किल्ला शिवाजींच्या स्वराज्याच्या लढाईतला महत्वाचा टप्पा होता. घोरपडीच्या मिथकाचा सुद्धा इथे हुशारीने वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे या मिथकाला किंवा आख्यायिकेला एक वेगळीच कलाटणी मिळते.
पण ऐतिहासिक चित्रपटांमध्ये जे पौरुषत्व किंवा राष्ट्रीयतेचं अधिकच गुणगाण असतं, ते इथेही आहे. भगव्याचा सारखा होत असलेला उल्लेख, मुघलांच्या गुलामीत राहणाऱ्या आणि कुणाच्या मरणावर साधं 'श्री राम' सुद्धा म्हणायचं स्वातंत्र्य नसलेल्या मराठ्यांना दिलेलं देवगणचं भाषण, हे सुद्धा त्याच श्रेणीतलं आहे. राजपूत या शब्दाला मूक करण्यात आलं आहे, ज्याचं कारण अर्थातच कुठल्याही वादाला टाळणं हेच असेल.
कुठल्याही चित्रपटाचा दर्जा हा त्याच्या कथेच्या मांडणीवर फक्त अवलंबून नसतो. ओम राऊत यांनी या कथेला जबरदस्त ऍक्शन आणि कमालीच्या दृश्यात्मकतेची जोड दिली आहे. युद्धाचे प्रसंग अतिशय कल्पकतेने कोरिओग्राफ करण्यात आले आहेत. स्लो-मोशन तंत्राचा योग्य वापर इथे करण्यात आला आहे. पुढच्या रांगेत बसणाऱ्या प्रेक्षकांना टाळ्या आणि शिट्ट्यांसाठी पुरेपूर मसाला यात आहे.
कीको नाकाहारा यांची सिनेमॅटोग्राफी प्रत्येक बारकावे टिपत ३०० (२००६) या सिनेमाचा लुक या चित्रपटाला देते, ज्याचं खरंच कौतुक व्हायला हवं. रमझान बुलूत-तोलगा डेगीर्मेन-आर पी यादव यांची साहस दृश्यं कमाल आहेत. प्रॉडक्शन डिझाईन भव्य आणि उत्तम आहे. पर्वतांच्या कडांचे शॉट्स, खऱ्या किल्यांचं बांधकाम आणि प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉपचा वापर बघून आपल्याला स्तब्ध व्हायला लावतं. सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांचं पार्श्वसंगीत प्रचंड ऊर्जामय आहे.
सैफ अली खान यांचा उदयभान राठोड धूर्त, कावेबाज आहे, जो अजय देवगण यांच्या तानाजी विरुद्ध तितकाच मोठा प्रतिस्पर्धि म्हणून उभा आहे. खान यांनी या व्यक्तिरेखेला ज्या धूर्त पद्धतिने रंगवलं आहे, ते बघणं खरंच एक सुखद अनुभव आहे. वेगळ्या, अनपेक्षित असणाऱ्या व्यक्तिरेखा साकारण्यात त्यांना मजा येते, असं वाटतंय. ऍक्शन दृश्यांमध्ये ते वेगळीच ऊर्जा घेऊन येतात आणि काही दृश्यांमध्ये आवश्यक तो विनोद सुद्धा ते सहज आणतात.
अजय देवगण यांनी तानाजीचं गंभीर रूप समर्थपणे पुढे आणलंय. या भूमिकेत ते पूर्णपणे उठून दिसतात. राऊत आणि कापडिया यांनी त्यांना उत्तम संवाद आणि जबरदस्त ऍक्शन दिलं आहे. त्यांची मराठी सरावाने बोलल्यासारखी जरूर वाटते, पण त्याचा मोजका आणि नेमका वापर केला गेल्याने ते तितकंसं खटकत नाही.
शिवाजी महाराज यांची भूमिका करणाऱ्या शरद केळकर यांचा विशेष उल्लेख करायला हवा, कारण छोट्याशा भूमिकेत सुद्धा त्यांनी आपली स्वतंत्र छाप पाडली आहे. बहुतेक कलाकार कुठलाही राजा साकारताना एक प्रकारचा ताठरपणा, पौरुष आणि अभिमान यांचा भाव घेऊनच ती भूमिका साकारत असतात, पण केळकर यांनी त्यांना सामान्य माणसासारखं दाखवलं आहे. घरी लग्न असतानाही तानाजी बलिदानासाठी तयार आहे, हे कळल्यावर होणारी त्यांची मनस्थिती आणि त्यांचा शेवटचा प्रसंग यात ते कमालीचे सहज मात्र तरीही ठाशीव असा अभिनय करतात.
तान्हाजी – द अनसंग वॉरीअर हि एका योध्याची वीरगाथा आहे. इतिहासाशी तंतोतत प्रामाणिक राहून केलेलं हे काम बहुदा नसेलही, पण यात मनोरंजन, हिरोईजमचे क्षण आणि एक चतुर खलनायक आहे, ज्यामुळे तुमच्या वेळेचं चीज नक्कीच होतं.
Related topics
You might also like
Review Hindi
Jogi review: Diljit Dosanjh-starrer is more like a thriller revolving around 1984 riots
The Ali Abbas Zafar film takes you by surprise with the riot angle brought in much earlier in the...
Review Hindi
Matto Ki Saikil review: Prakash Jha leads this sentimental saga of socio-economic inequality
Written and directed by M Gani, the Hindi film is a patchy yet heartbreaking look at the bleak class...
Review Hindi
Jhini Bini Chadariya review: A moving lamentation for the holy city of Varanasi
Ritesh Sharma’s hard-hitting film lays bare the social fabric of the city and the growing...