{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

मिरांडा हाऊस रिव्ह्यू – या रहस्यपटामध्ये थरारच नाही

Release Date: 17 Apr 2019 / Rated: U/A / 01hr 25min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Blessy Chettiar

राजेंद्र तालक दिग्दर्शित या द्विभाषिक चित्रपटाचा उद्देश काय हेच प्रेक्षकांना कळत नाही.

दोन अनोळखी व्यक्ती गोव्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर भेटतात आणि एक व्यक्तीच्या अस्तित्वामुळे त्यांच्या आयुष्यात कसे समस्या निर्माण झालेत यावर बोलत बसतात. आर्टिस्ट विक्रम (साईंकित कामत) आणि ग्राफिक डिझायनर प्रिया (पल्लवी सुभाष) यांची मिरांडा हाऊस या बंगल्या समोरच दोन वेळा योगायोगाने भेट होते. दोघेही विक्रमच्या हॉटेल रूम मध्ये जातात. पण दोघांनाही एकमेकांच्या हेतूविषयी शंका असते.

तिथे ड्रिंक्स घेत असताना विक्रम प्रियाला सांगतो की समर बांदोडकर नावाच्या व्यक्तीला विक्रमच्या वडिलांच्या पेंटिंग्स हव्या आहेत. विक्रमच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. प्रिया सुद्धा मग आपली कहाणी सांगू लागते. समरने तिच्या आईला लग्नाचे वचन दिले होते परंतु तिची आई गरोदर असताना तो तिला सोडून निघून गेला. आता ते दोघेही एकमेकांशी पूर्ण खर बोलतायत का खोटं बोलतायत? आणि दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांशी आपल्या गुप्त ठेवलेल्या गोष्टी का व्यक्त करत आहेत?

राजेंद्र तालक दिग्दर्शित मिरांडा हाऊस खूप वेगळ्या प्रकारचा थरारपट आहे. रेसूल पूकुट्टी आणि अमृता प्रीतम दत्त यांचे साउंड डिजाइन उत्तम असले तरी या चित्रपटाच्या विषयाला ते शोभत नाही. तरी या साउंड डिज़ाइनमुळेच चित्रपट पाहण्यात थोडा रस येतो.

चित्रपट खूप स्लो आहे आणि हीच चित्रपटातली सर्वात खटकणारी गोष्ट आहे. तालक यांचा हा चित्रपट मुद्दाम स्लो करण्याचा निर्णय पूर्ण फसला आहे. कोकणी नाट्यक्षेत्रातले दिग्गज प्रिन्स जेकब आणि जॉन डिसिल्व्हा यांना अक्षरशः या चित्रपटात वाया घालवलं आहे. साईंकित कामत आपल्या पहिल्याच चित्रपटात कॉन्फिडन्ट वाटतात. पण पल्लवी सुभाष यांचे पात्र लिखाणातच कमजोर आहे.

'सगळा नजरेचा खेळ असतो' असं वाक्य आपण एका पात्राच्या तोंडी ऐकतो, पण या चित्रपटाचा मूळ उद्देश काय हेच प्रेक्षकांना कळत नाही. फक्त दीड तासाचा असूनसुद्धा मिरांडा हाऊस खूपच कंटाळवाणा झालाय. त्यापेक्षा या विषयावर एखादा लघुपट बनवला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता असे वाटत राहते.

साउंड डिजाइन व्यतिरिक्त अजून एक भावलेली गोष्ट म्हणजे सूरज कुराडे यांचे कॅमेरावर्क. काही इंटरेस्टिंग टॉप अँगल्स आणि कॅमेरा मुव्हमेंट्स नक्कीच आपल्या लक्षात राहतात. वर्धन धामोडकर यांची एडिटिंग सुद्धा उत्तम झाली आहे. परंतु फक्त तांत्रिक बाजू चांगल्या असल्या म्हणजे चित्रपट उत्तम होतो हा मोठा गैरसमज आहे.

मिरांडा हाऊस हा द्विभाषिक चित्रपट मराठी आणि कोकणी भाषेत रिलीज झाला आहे. काहीच पब्लिसिटी न केल्यामुळे हा चित्रपट एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चित्रपटगृहांमध्ये टिकू शकत नाही असे वाटते. गोवा तुमचे आवडते पर्यटनस्थळ असले तरी हा चित्रपट न पाहिलेलाच बरा.

 

Related topics

You might also like