Suyog Zore
मुंबई, 08 Feb 2020 7:30 IST
गणेश पंडित यांचा हा चित्रपट नेहमीच्या वळणाने गोष्ट मांडण्याचं टाळत मैत्रीवर आणि आयुष्यात पुढे जाण्यावर नव्या अंगाने भाष्य करतोय.
मेकअप हि नेहमीची रोमँटिक कॉमेडी नाही. खरं तर हि रोमँटिक कॉमेडी सुद्धा नाही. नव्या वळणाच्या चित्रपटांचा हा सर्वोत्कृष्ट नमुना नसला तरी हा त्या धाटणीचा चित्रपट नक्कीच म्हणता येईल.
चित्रपटाचा ट्रेलर आणि जे काही प्रमोशन होत आहे त्यावरून चित्रपटाचा अंदाज बांधणं चुकीचं ठरेल. चित्रपटात काय आहे याचा अंदाज जरी त्यातून येत असला, तरी ट्रेलर बघून जो अंदाज तुम्ही बांधला असाल, तसं काहीही चित्रपटात होत नाही.
पूर्वी (रिंकू राजगुरू) हि महत्वकांक्षी मुलगी आहे, जिला टेलिव्हिजन आणि चित्रपटात मेकअप आर्टिस्ट व्हायचय. पण तिच्या कुटुंबला, खास करून तिचा भाऊ (तेजपाल वाघ) ह्याला तिने लग्न करावं असं वाटतं. जेव्हा कुठलं स्थळ तिला बघायला येतं, पूर्वी कुठली तरी युक्ती करून त्यातून आपली सुटका करून घेते. यासाठी काही वेळेस ती आपल्या मित्र-मैत्रिणींची सुद्धा मदत घेते.
नील (चिन्मय उदगीरकर) अमेरिका-रिटर्न डॉक्टर आहे, जो उच्च वर्ग कुटुंबातील आहे. त्याच्या आईला (सुमुखी पेंडसे यांना) वाटतं कि त्याने अमेरिकेतच काम बघून तिथेच राहावं. त्याचे वडिल (राजन ताम्हाणे) मात्र छान आरामात राहावं अशा विचारांचे आहेत.
नील आणि पूर्वीच्या पहिल्या भेटीत दोघात खुन्नस निर्माण होते, मात्र नंतर दोघांची मैत्री होते. त्यांचे कुटुंबीय दोघांचं लग्न करून द्यायला तयार आहेत. पण पूर्वीचं नील वर प्रेम आहे काय, कि तिचा दुसराच काही हेतू आहे?
दिग्दर्शक गणेश पंडित यांनी कथा नेहमीच्या वळणाने न नेता त्यात वेगळेपणा जपलाय. चित्रपटाच्या मध्यंतरात चित्रपटात एक मोठं ट्विस्ट येतं. मग उत्तरार्धात चित्रपट वेगळेच वळण घेतो. चित्रपटाच्या कथेमध्ये सुद्धा हा बदल कुठल्याही पूर्व सूचने शिवाय इतक्या वेगाने होतो कि तुम्ही बेसावध क्षणी पकडले जाता. हे खरं तर रिस्की होऊ शकलं असतं, कारण दर्शकांना असा अचानक धक्का देणे त्यांना रुचेल कि नाही हे नक्की सांगता येणं कठीण असतं.
चित्रपटाचा पूर्वार्ध कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे छानच रंगलाय. अभिनयाच्या बाबतीत सगळ्याच कलाकारांनी आपले सर्वोत्तम दिले आहे.
रिंकू राजगुरू यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय कि त्यांचं आधीचं यश हे केवळ एका चित्रपटापुरतं मर्यादित नाही. आपल्या पात्राची प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने आणि उत्तमपणे मांडली आहे. त्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केला आहे.
चिन्मय उदगीरकर सुद्धा आपल्या भूमिकेत उत्तम आहेत. गंभीर ते गमतीशीर, मुक्त पात्र असा प्रवास त्यांच्या व्यक्तिरेखेत घडताना दिसतो आणि त्यांनी दोन्हीमध्ये सहज वावरत आपले काम चोख केले आहे.
उदगीरकर मराठी चित्रपटांमध्ये जवळपास १० वर्षांपासून काम करत आहेत, मात्र हि भूमिका त्यांच्यासाठी विशेष म्हणावी लागेल. तेजपाल वाघ यांचा अभिनय सुद्धा असाच आपलं वेगळेपण घेऊन येतो. फार वेळ स्क्रीन वर न दिसता सुद्धा त्यांनी आपली छाप सोडली आहे. इतर कलाकारांमध्ये राजन ताम्हाणे असो वा स्वाती बोवलेकर, ज्यांनी पूर्वीच्या आज्जीची भूमिका केली आहे, सगळ्यांनी अभिनयात सहजता दर्शवली आहे.
गणेश पंडित यांनीच लिहिलेल्या या स्क्रिप्ट मध्ये विनोदाच्या प्रमाणात समतोल ठेवला गेलाय. मजेदार संवादासोबत त्यांनी कथेच्या भावनिकतेची सुद्धा काळजी घेतली आहे. पण शेवटाकडे काही गोष्टी मेलोड्रॅमॅटिक होत जातात आणि अचानक एके क्षणी एका पात्राचं हृदय परिवर्तन होणं हे पचवणं कठीण जातं.
गुंतागुंतीचा क्लायमॅक्स सुद्धा संपूर्ण अनुभवाचा परिणाम कमी करतो. उत्तरार्धात १०-१५ मिनिटे चित्रपट लांबल्यासारखा वाटतो. पण आपल्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नात गणेश पंडित उत्तम छाप सोडतात. यापूर्वी त्यांनी बालक पालक (२०१३) आणि येलो (२०१४) सारखे चित्रपट लिहिले आहेत.
मेकअप मध्ये तीन गाणी आहेत आणि सगळी गाणी पटकथेत व्यवस्थित पेरली गेली आहेत. चित्रपटाचं छायांकन चांगले आहे आणि प्रॉडक्शन डिझाईन सुद्धा यथायोग्य आहे. जर मोकळ्या मनाने हा चित्रपट बघायला जाणार असाल, तर तुम्हाला हा चित्रपट नक्कीच सुखावेल.
Related topics
You might also like
Review Marathi
Samaira review: This well-intentioned travel drama suffers from a dull script
Actor Rishi Deshpande's directorial debut doesn't rise as much as its performances. ...
Review Marathi
Goshta Arjunchi review: Triggering conversations about mental health
Anupam Barve’s short film urges people to talk to their families about what they are going...
Review Marathi
Ekda Kaay Zala review: Sumeet Raghvan impresses in a film that does not use its full potential
Directed by Dr Saleel Kulkarni, the film has a fine act by child artiste Arjun Purnapatre....