{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

केसरी रिव्ह्यू – फॉर्मुल्यात अडकलेला स्पोर्ट्स चित्रपट, नवेपणाचा अभाव

Release Date: 28 Feb 2020 / Rated: U / 02hr 34min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Suyog Zore

हा चित्रपट खेळाविषयी असलेल्या कुठल्याही साधारण चित्रपटांच्या मार्गाने जातो व कुठलाही वेगळा प्रभाव पाडण्यात यशस्वी होत नाही. अनावश्यक प्रेमकथेची जोड देण्याचा अट्टहास दिग्दर्शकाला टाळता आला असता.

सुजय डहाके यांचा केसरी (२०२०) हा सर्वसाधारणपणे जे स्पोर्ट्स चित्रपट बनतात त्याच वळणाने जातो, ज्यात एक पैलवान महाराष्ट्र केसरी जिंकण्यासाठी शर्थीने प्रयत्न करतोय आणि वडिलांचा आणि गावकऱ्यांचा त्यासाठीचा विरोध, पैशांची कमतरता आणि असे अनेक अडथळे त्याच्या या प्रयत्नाच्या आड येत असतात. कुठलाही खेळ विषयक चित्रपट बघा आणि त्यात तुम्हाला अशाच वळणाची गोष्ट बघायला मिळेल.

चित्रपटाची सुरुवात होते ती बलराम (विराट मडके) पासून, जो त्याचा पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे, मात्र त्याचे वडील (उमेश जगताप) त्याला मैदानातून बाहेर खेचतात. इथे चित्रपटाचा संघर्षबिंदू कळतो. बलराम गुपचूप छोट्या कुस्तीच्या सामन्यामध्ये भाग घेतो आणि जिंकतो, पण त्याला हे माहित नसतं कि हा महाराष्ट्र केसरीचा पात्रता सामना होता.

आता असा प्रश्न उद्भवतो कि महाराष्ट्र केसरीसाठी ट्रेनिंग आणि जवळपास रु५०,००० महिन्याचा खर्च कसा जमा करायचा.

गॅरेजचा मालक असलेला वस्ताद मेहमान (महेश मांजरेकर) त्याच्या काळातला उत्कृष्ट पैलवान होता. तो बलरामच्या मदतीला धावून येतो आणि त्याला आपला पठ्या बनवतो. इथून बलरामचा वेगळा सराव सुरु होतो, जो चित्रपटाच्या शेवटापर्यंत सुरु राहतो.

सरावातील काही तंत्र का आहेत ते कळत नाही, जसे कि खरी स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधी मेहमान बलरामला कोल्हापूर ते रत्नागिरी धावायला लावतो.

नियाज मुजावार यांची पटकथा सरधोपट आहे. एकदा का संघर्षाचा मुद्दा स्पष्ट झाला कि चित्रपट ठरलेल्या वळणावरून जात राहतो आणि शेवट पर्यंत त्यात कुठेही बदल होत नाही. बलरामचा मूळ संघर्ष हा शारीरिक असल्यामुळे चित्रपट भावनिकतेमध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात अयशस्वी होतो.

आणखी एक खटकणारा मुद्दा म्हणजे एकाच वळणाच्या व्यक्तिरेखा, केसरी मध्ये अशाप्रकारची अनेक पात्र आहेत. बलरामचे आई-वडील (छाया कदम, उमेश जगताप), त्याचे मित्र (नचिकेत पूर्णपात्रे, सत्यप्पा मोरे) सगळे ठरलेल्या साच्यातच वागतात. त्याचे मित्र कोण आहेत? जगण्यासाठी ते काय करतात? त्यांना त्यांचं आयुष्य नाहीच का? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याच चित्रपटात मिळत नाहीत, तशी ती इथेही मिळत नाहीत.

मडके नंतर मांजरेकर यांना सगळ्यात जास्त स्क्रीन टाइम मिळालाय, पण त्यांची व्यक्तिरेखा पुरेशी फुलवण्यात आलेली नाही. जेव्हा तुम्हाला असं पात्र उभं करायचं आहे, ज्याचं कौशल्य खेळात किंवा कलेमध्ये निर्विवाद आहे, तेव्हा तुम्ही त्याचं कौशल्य दाखवता. पण इथे बाकीची पात्रच त्या व्यक्तिरेखेच्या कौशल्याबद्दल बोलताना दिसतात. मांजरेकरांचं पात्रं इथे कमकुवत वाटतं.

डहाके यांनी वस्ताद मेहमानला मोठा कुस्तीपटू म्हणून प्रत्यक्ष दाखवलेलं नाही. ते आपल्याला शब्दातून कळतं. एका दृश्यात आपण वस्तादला प्रत्यक्ष खेळताना बघतो, मात्र हे दृश्य खूप छोटं आणि गडबडीने संकलित केल्याचं लक्षात येतं. कदाचित मांजरेकरांच्या अक्षम शारीरिक हालचाली लपवणे हा त्यामागचा उद्देश्य असेल. त्यामुळे ते खोटं वाटायला लागतं आणि हे पात्र एकेकाळी मोठा कुस्तीवीर होतं यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसतं.

चित्रपटात दोन स्त्री पात्रं आहेत, बलरामची आई आणि त्याची प्रेयसी (रूपा बोरगावकर). बलरामशी त्यांचं असलेलं नातं यापलीकडे त्यांचं फारसं अस्तित्व नाही. या कलाकारांनी हे काम का निवडलं असावं, यापेक्षा मोठा प्रश्न आहे कि कथेला कुठेही पूरक नसलेली अशी एकांगी पात्रं का लिहिली जातात?

डहाके या दोन्ही पात्रांना टाळू शकले असते आणि याचा गोष्टीला कुठलाही फरक पडला नसता. दुसरं म्हणजे चित्रपट अधिक थेट झाला असता.

बोरगावकर यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. संपूर्ण चित्रपटात त्यांना फक्त तीन संवाद आहेत. त्यात सगळेच एका वाक्यापलीकडे नाहीयेत. बरं, यात कुठेही अतिशियोक्ती नाही. तुम्ही ते मोजू शकता. ती पडद्यावर फक्त कपडे धुवत असते किंवा नायकाकडे बघून आकर्षित होत असते. दहा मिनिटांच्या स्क्रीन टाइम वर त्यांना चित्रपटाच्या नायिकेचं क्रेडिट देण्यात आलंय.

विक्रम गोखले यांनी बलरामच्या आजोबांच पात्र साकारलं आहे, जे ५० वर्षा आधी महाराष्ट्र केसरी हरले होते. पण गावकरी त्यांना आजही त्या गोष्टीवरून दोष देतात आणि त्यांना पळपुटे म्हणून हिणवत असतात.

विराट मडके यांनी त्यांच्या पात्राला पुरेपूर न्याय दिलाय. त्यांनी भरपूर शारीरिक मेहनत घेतल्याचंही लक्षात येतं. पण चित्रपटाची संहिता त्यांना यापेक्षा अधिक काही करण्याची संधी देत नाही.

संदीप यादव यांची सिनेमॅटोग्राफी आणि ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचं संगीत चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. चित्रपटाची शूटिंग पावसाळ्यात झाली आहे आणि यादव यांनी कोल्हापूरचं सौंदर्य आपल्या कॅमेरामधून उत्तम पद्धतीने टिपलंय. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट बघताना छान वाटतं.

चित्रपटात चार गाणी आहेत, त्यातली दोन रॅप आहेत आणि दोन रोमँटिक आहेत. रोमँटिक गाण्याने चित्रपटाचा वेग मंदावतो, मात्र दोन्ही गाण्यांचं संगीत उत्तम आहे आणि ते वारंवार ऐकावेसे वाटतात.

काही ठिकाणी चित्रपटाचं संकलन खुपच साधारण वाटतं. डहाके यांनीच चित्रपटाचे संकलन केले आहे. काही दृश्य अचानक कापण्यात आली आहेत. सरावाच्या स्लो मोशन दृश्यांवर अधिक भर देण्यात आला आहे, हे सुद्धा जाणवत राहतं.

एकंदर, मराठी चित्रपटांमध्ये एका उत्तम स्पोर्ट्स चित्रपटाचा शोध अजूनही सुरूच आहे.

 

Related topics

You might also like