{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

कबीर सिंह रिव्ह्यू – हा पुरुषांच्या कल्पनेतला हिरो सत्यात मात्र उतरू नये

Release Date: 21 Jun 2019 / Rated: A / 02hr 55min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Shriram Iyengar

अर्जुन रेड्डी वंगा दिग्दर्शित कबीर सिंग मध्ये शाहिद कपूर यांनी आपल्या अभिनयाने हे पात्र अक्षरशः जिवंत केले आहे.

'बॅड बॉय' इमेजबद्दल सर्वांनाच आकर्षण असते. पुराणकाळापासून कला आणि साहित्यामध्ये आपल्याला असे हिरो आढळतात. अर्जुन ते अकिलीज अशी अनेक उदाहरणे देता येतील. आता त्या यादीमध्ये कबीर सिंह (२०१९) चे नाव सुद्धा जोडले गेले पाहिजे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डी (२०१७) च्या या अधिकृत रिमेक मध्ये शाहिद कपूर प्रेमात अयशस्वी झाल्याने संपूर्ण जगावर त्याचा राग काढणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसतात. उत्तम छायाचित्रण, उत्साहवर्धक पार्श्वसंगीत आणि शाहिद कपूर यांचा उत्कृष्ट अभिनय या तीन गोष्टींमुळे कथेमध्ये असलेल्या त्रुटींवर पडदा टाकत चित्रपट तुमचे मनोरंजन करण्यात यशस्वी होतो.

वर्तमान आणि भूतकाळामध्ये ही कथा घडत असते आणि शाहिद कपूर यांच्या वाढलेल्या दाढीवरून आपण आता भूतकाळात आहोत का वर्तमानात हे ठरवायचे. कबीर सिंह गुणवान मेडिकल सर्जन आहे परंतु प्रेमभंग झाल्यामुळे तो दारू, ड्रग्सच्या आहारी जाऊन नैराश्यवादी होतो. त्याचाच रागीट स्वभाव त्याचेच नुकसान करतो.

कबीर आणि प्रीती (कियारा अडवाणी) च्या प्रेमा मध्ये सुद्धा कबीरची अधिकारवृत्ती दिसून येते. प्रीतीच्या वर्गात घुसून तिने कोणासोबत मैत्री करावी हे जेव्हा कबीर तिला सांगतो तो सीन काहीजणांना नक्कीच अस्वस्थ करेल. कबीर प्रीतीला कॉलेजमध्ये पाहताच आपला कॉलेज सोडून जाण्याचा विचार बदलून टाकतो.

कबीर सिंह मध्ये रेड्डी वंगा यांनी अर्जुन रेड्डी मधून काही सीन तसेच्या तसे कॉपी केले आहेत. चित्रपटातील काही हिंसाचाराचे आणि जवळजवळ लैंगिक अत्याचारच म्हणता येईल असे सीन्स पाहताना सुद्धा आपण अस्वस्थ होतो. कबीरने काहीही केले तरी त्याचे मित्र, कुटुंबीय इतकेच नव्हे तर हॉस्पिटलमधले इतर कर्मचारी सुद्धा त्याच्या सोबत असतात.

दारू आणि ड्रग्स च्या आहारी गेलेला आणि ज्याचा स्वतःच्या रागावरसुद्धा ताबा नाही अशा माणसाची कथा असूनसुद्धा चित्रपटाचा शेवट या मानसिकतेला अधिक प्रवृत्ती देणारा आहे. आपले मित्र, सहकारी अगदी घरच्या मोलकरणीला मारायला धावणारा, स्वतःच्या गर्लफ्रेंड वर हात उचलणाऱ्या कबीर सिंहची ही सर्व चुकीची कृत्ये पॅशनचे नाव देऊन झाकण्याचा प्रयत्न केला आहे.
शाहिद कपूर यांनी कबीर सिंहचा बाज अगदी योग्य पकडला आहे. विजय देवराकोंडा यांच्या तोडीसतोड शाहिद यांचा अभिनय आहे. फक्त काही इमोशनल सीन्समध्ये शाहिद थोडे कमजोर वाटतात.

कियारा अडवाणीने त्यांच्या वाट्याला आलेले सीन्स उत्तम निभावले आहेत. प्रीतीचा स्वभाव पाहता कबीर तिच्या प्रेमात का पडतो हे आपण समजू शकतो.

सुरेश ओबेरॉय आणि अर्जन वाजवा दोघांचाही अभिनय चांगला आहे परंतु खरी बाजी मारलीय सोहम मुजुमदार यांनी. सोहम यांनी चित्रपटात कबीरचा मित्र शिवाची भूमिका साकारली आहे. सर्व चांगल्या वाईट परिस्थितींमध्ये शिवा नेहमी कबीरची साथ देतो.

१७५ मिनिटाचा हा चित्रपट नक्कीच लांबला आहे. कदाचित पटकथावर थोडा अधिक विचार करून काही दृश्यांना कात्री लावता आली असती. सर्व साहसदृश्ये ते अगदी मोटारबाइक चालवण्याचा सीन सुद्धा सन्थानकृष्णन रविचंद्रन यांच्या प्रभावशाली कॅमेरावर्कमुळे अधिक उठून दिसतात. त्याला हर्षवर्धन रामेश्वरच्या उत्कृष्ट संगीताची सुद्धा जोड मिळाली आहे.

अर्जुन रेड्डी अथवा कबीर सिंह सारखं बनण्याची सुप्त इच्छा बहुतेक सर्वच पुरुषांच्या मनात असते. या जगात जेव्हा ९०% लोक आपल्या मनातल्या इच्छा, राग, द्वेष, स्वाभिमान मारून जगत असतात तेव्हा काही मोजके कबीर सिंह आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगतात आणि हवं ते मिळवतात. पुरुषांना हाच कबीर सिंह बनण्याची इच्छा असते, परंतु हा कबीर सिंह फक्त  स्वतः साठीच नव्हे तर त्याच्या हितचिंतक आणि कुटुंबियांसाठी सुद्धा घातक असतो.

 

Related topics

You might also like