{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

जून रिव्ह्यू – मनाचा ठाव घेणारी गोष्ट, ज्यात दोन सदोष व्यक्ती एकमेकांना मदत करत स्वतःच्या चुकांच्या परिणामांना सामोरं जातात

Release Date: 30 Jun 2021 / 01hr 34min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Suyog Zore

स्वतःचा स्वतःशीच चाललेला आंतरिक झगडा आणि त्याने होणारी भावनिक गुंतागुंत अशा आशयावर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे ब्यास यांनी उत्तम अभिनय करत त्यांच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवलंय.

कागदावर बघाल तर जूनची गोष्ट अगदी सोप्पी आहे. दोन सदोष व्यक्ती स्वतःच्या चुकांमुळे प्रचंड अस्वस्थ आहेत, ते एकमेकांच्या सहवासात येतात आणि यातून बाहेर पडण्यासाठी एकमेकांची मदत करतात. मात्र नेहा पेंडसे ब्यास आणि सिद्धार्थ मेनन या दोन मुख्य कलाकारांचा संयत आणि तितकाच प्रभावी अभिनय आणि पहिल्यांदाच दिग्दर्शन करणारी द्वयी सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांचे अनेक पातळीवर घडणारे दिग्दर्शन या चित्रपटाला भावनिकतेने गुंतवून ठेवतात. यात एक महत्वपूर्ण संदेश सुद्धा दिसून येतो, तो म्हणजे मानसिक पातळीवर जी गोष्ट आपल्याला छळतेय, त्यापासून पळ काढण्यापेक्षा त्याचा सामना करा.

जून हि आजच्या काळातील वेगळी गोष्ट अशासाठी सुद्धा ठरते कारण दोन अनोळखी व्यक्ती, ज्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारे साम्य नाही, स्वतःबद्दलचे कटू सत्य हळू हळू स्वीकारतात आणि एकमेकांना चांगला मनुष्य बनण्यास मदत करतात. लेखक निखिल महाजन आणि दिग्दर्शक द्वयीने या गोष्टीत एक वेगळे असे ट्विस्ट सुद्धा जोडले आहे, ते म्हणजे हि जोडी एकमेकांच्या प्रेमात पडत नाही.

नील (मेनन) २१ वर्षांचा त्रस्त युवक आहे. त्याला सतत वडिलांचा राग सहन करावा लागतो कारण त्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळत नाहीत. नील त्याच्या इंजिनियरिंगच्या परीक्षेमध्ये नापास झालाय आणि आता हे वर्ष त्याला असंच बसून काढायचं आहे. पण तो एका विचित्र मानसिक धक्क्यात आहे, ज्याबद्दल तो कुणाला सांगत नाही, अगदी गर्लफ्रेंड निक्की (रेशम श्रीवर्धन) हिला सुद्धा नाही. तसंही तिच्यासोबत त्याचं नातं आता चांगलं राहिलेलं नाही. त्याला कुठल्याच प्रकारे चांगला मनुष्य म्हणता येणार नाही. मुस्लिमांचा तो तिरस्कार करतो, गर्लफ्रेंडला तुच्छ वागणूक देतो आणि स्वतःच्या रागावर त्याचा जराही ताबा नसतो.

नेहा (पेंडसे) विवाहित स्त्री आहे. ती औरंगाबादला आलीय. तिच्या नवऱ्याचं हे बालपणीच शहर आहे. स्वतःच्या भावनेवर तिचे पूर्ण नियंत्रण आहे, असं ती सतत भासवत असते. पण तिच्या कठोर चेहऱ्यामागे एक नाजूक नेहा दडली आहे, जी तिच्या एका चुकीच्या वागणुकीच्या प्रभावातून बाहेर पाडू पाहतेय, अशी चूक जी तिने केली असेल किंवा नसेलही.

दोघे भेटतात आणि दोघांमध्ये मैत्री होते. दोघांना लक्षात येतं कि दोघेही कुठल्याश्या मानसिक त्रासातून जात आहेत, जे ते जगापासून लपवत आहेत. चित्रपटाचा वेग मुद्दामहून संथ ठेवण्यात आलाय, जेणेकरून प्रेक्षकांना त्यांची मनोवस्था समजू शकतील. प्रत्येक दृश्य आणि संवादातून आपल्याला त्यांच्या व्यक्तिरेखा आणि ते कुठून येताहेत हे आणखी चांगल्या प्रकारे कळायला लागतं.

ते संवाद साधतात, नात्यांविषयी त्यांची मतं एकमेकांसमोर ठेवतात, काही मुद्यांवर सहमत होतात, तर काही मुद्यांवर भांडतात सुद्धा. पण सरते शेवटी ते समजून घेतात कारण त्यांना माहित आहे कि त्यांच्यासाठी त्यांना समजून घेणारे ते दोघेच आहेत.

मेनन आणि पेंडसे यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा गुणदोषांसकट स्वीकारल्या आहेत. पश्चाताप दग्ध आणि प्रत्येकाला दूर लोटणाऱ्या मुलाची भूमिका मेनन यांनी पुरेपूर साकारली आहे. नील हा आवडणाऱ्या मुलांसारखा नाहीय. बहुतेक वेळा तर तो एक विचित्र मुलगा म्हणूनच समोर येतो ज्यात फार थोडं चांगलं काही सांगता येईल. तरी सुद्धा मेनन यांच्या अभिनयातून या पात्राविषयी सहानुभूती निर्माण होते. आपण त्याचा तिरस्कार करत नाही. हि एक अशी धूसर सीमा रेषा आहे, जिथे प्रेक्षकांनी या पात्राच्या कृतीचे समर्थन करू नये पण त्याचा तिरस्कार सुद्धा करू नये हे सांभाळायचे आहे. गोडबोले आणि खिस्ती यांच्या कुशल दिग्दर्शनाच्या साहाय्याने मेनन यांनी हि सीमा रेषा सहजतेने सांभाळली आहे.

याच वर्षी सिनेस्तानशी बोलताना गोडबोले यांनी सांगितले होते कि या चित्रपटातून नेहा पेंडसे सगळ्यांना चकित करणार आहे आणि त्यांनी तसे केले सुद्धा. हि भूमिका त्यांची सर्वोत्तम भूमिका म्हणावी लागेल. स्वतः एका अस्वस्थ मनोवस्थेत फसलेले असताना दुसऱ्या एका अस्वस्थ मानसिकतेच्या व्यक्तीचा मार्गदर्शक बनणे हे चित्र उभे करताना त्यांनी उत्तम अभिनयाचा नमुना दर्शविला आहे.

नीलच्या वडिलांच्या भूमिकेत किरण करमरकर यांनी उत्तम काम केले आहे. वाया जात असलेल्या मुलाकडे हतबलतेने बघताना होणारा त्रास सुद्धा त्यांनी उत्तम पद्धतीने दर्शवलाय. हा बाप दुखावलाय कारण शैक्षणिक लोन घेऊन सुद्धा त्याचा मुलगा अपयशी ठरलाय. एवढंच नाही, त्याच्या दुखावण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचा मुलगा हळू हळू त्याच्यापासून दुरावतोय आणि तो आता त्यांचं नातं पहिल्यासारखं करण्यासाठी काहीही करू शकत नाहीय.

चित्रपट बहुतांश ठिकाणी 'स्वतःला माफ करायला शिका' या थीमपासून दूर जात नाही. फक्त एके ठिकाणी, जिथे एक सामाजिक नैतिकता वगैरेचा सबप्लॉट दिसून येतो, तिथे ते थोडे अतिरंजित आणि वरवरचे वाटू लागते.

शाल्मली खोलगडे यांचं संयत संगीत सुद्धा छान साथ देत असले तरी बहुतेकदा संगीतविरहित शांतता अधिक प्रभावी वाटते. भावनिक प्रसंगात कुठल्याही पार्श्वसंगीताचा वापर न केल्याने दृश्यांची परिणामकारकता वाढली आहे.

स्वतःच्या भूतकाळाचा प्रभाव नाहीसा करण्याच्या कठीण प्रक्रियेवरचा चित्रपट म्हणून कुणाला जून हा कंटाळवाणा किंवा निरस असावा, असे वाटू शकेल. पण इथे प्रत्येकाचा अभिनय इतका दमदार आहे आणि गोष्ट इतकी गुंतागुंतीची आहे कि शेवटी हा चित्रपट मानवीय दृष्टिकोन देत आपल्या मनात घर करतो.

 

Related topics

Planet Marathi OTT

You might also like