{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

गॉन केश रिव्ह्यू – श्वेता त्रिपाठी आणि विपिन शर्मा या दोघांमधली केमिस्ट्री या चित्रपटाची जमेची बाजू आहे

Release Date: 29 Mar 2019 / Rated: U / 01hr 50min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Mayur Lookhar

पहिल्यांदाच दिग्दर्शन करणाऱ्या कासीम खालो यांनी लाखो स्त्री-पुरुषांना सतावणारा केसगळतीच्या गंभीर प्रश्नाला हाती घेतला आहे.

तुम्ही कसे दिसता यावरून समाजात तुमची स्विकार्यता ठरवली जाते. तुम्ही टापटीप कपडे घालत असाल तर समाजात तुम्हाला मानसन्मान मिळतो. केसांचे देखील यामध्ये खूप महत्व आहे. तुम्हाला जर टक्कल पडले असेल तर सर्व जण तुमचा मजाक उडवतात. खासकरून तरुण स्त्रीसाठी केसगळती हा खूप भयानक अनुभव असतो.

दिग्दर्शक कासीम खालो यांच्या गॉन केश मध्ये सिलिगुडीत राहणाऱ्या एनाक्षी दासगुप्ताची गोष्ट सांगितली आहे. ती एलोपेशिया या आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे ती शाळेत असल्यापासून तिचे केस गळायला सुरु होतात. आता ती २५ वर्षाची झाली असताना तिला पूर्ण टक्कल पडले आहे.

एनाक्षी सेल्सगर्ल म्हणून काम करत असलेल्या मॉलमध्ये डान्स स्पर्धा होणार असून तिला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी ती नोकरी सोडते. पण स्पर्धेपेक्षा तिला जास्त टेन्शन आहे की स्टेजवर तिचं सिक्रेट लोकांसमोर आलं तर?

तिच्यासाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे तिने केलेल्या महागड्या उपचाराचा देखील काहीच फायदा झाला नाही. टक्कल पडलेल्या मुलीशी कोण लग्न करेल याचं टेन्शन तिच्या पालकांनी घेतलं आहे.

पहिल्यांदाच दिग्दर्शन करणाऱ्या कासीम खालो यांनी लाखो स्त्री-पुरुषांना सतावणारा केसगळतीचा गंभीर प्रश्नाला हाती घेतला आहे. गॉन केश ही एक साधीसरळ गोष्ट आहे. चित्रपटात तुमच्या डोळ्यांचा कडा ओलावतील अशी दृश्येदेखील आहेत परंतु मुख्य कलाकारांचा अप्रतिम अभिनय ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

एनाक्षी(श्वेता त्रिपाठी) आणि तिचे आईवडील अनुप (विपिन शर्मा) आणि देबश्री (दीपिका अमीन) या तिघांनीही आपापल्या भूमिका छान निभावल्या आहेत. मसान (२०१५) आणि हरामखोर (२०१७) नंतर श्वेता त्रिपाठी ने गॉन केश मध्ये देखील आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. प्रॉस्थेटिक मेकअप आर्टिस्ट प्रीतीश्री सिंह यांच्या कौशल्यामुळे त्रिपाठीला खरोखरच टक्कल पडले आहे असे वाटते.

एनाक्षी आणि तिचे वडील यांची केमिस्ट्री अफलातून आहे. त्यांचे वडील-मुलीचे सीन्स आपल्याला भावुक करतात. एनाक्षी वापरत असलेल्या औषधांमुळे तिच्या चेहऱ्यावर देखील केस उगवायला लागलेत आणि औषधामुळे जे थोडेफार केस डोक्यावर आलेले ते सुद्धा पुन्हा गळायला लागले आहेत. एनाक्षी रडत असताना तिचे वडील जेव्हा तिची समजूत घालतात आणि तिचे केस उगवण्यासाठी सर्वार्थाने तिला मदत करण्याचे वचन देतात तो सीन खूप उत्तम जमून आलाय.

विपिन शर्मांची प्रेमळ वडिलांची भूमिका तारे जमीन पर (२००७) मध्ये त्यांनी साकारलेल्या रागीट, चिडचिड्या वडिलांच्या भूमिकेचं पूर्णतः विपरीत आहे. अनुप आपल्या मुली विषयी चिंतीत आहे पण घड्याळ विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या अनुपला आपल्या बायको बरोबर आग्र्याला ताज महाल पाहायला जायचं आहे. अनुप आणि देबश्री सारखी लाखो जोडपी आहेत जी कधी आपल्या शहराबाहेर फिरायला गेली नसतील, कधी विमानतळ पहिले नसेल.

जितेंद्र कुमार छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत आपली छाप सोडून जातात. फर्स्ट हाफ थोडा पसरट झाला आहे. 'बीबी' हे गाणे श्रवणीय आहे परंतु इतर गाणी मात्र निराश करतात.

गॉन केश अपेक्षित वळणं घेत पुढे जातो तरीही चित्रपटाचा विषय वेगळा आणि महत्वाचा आहे. चित्रपटात हेअर ट्रीटमेंटच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या दवाखान्यांच्या उपचारांवर सुद्धा प्रश्न उभा केला आहे. तरी त्यांच्यावर डायरेक्ट आरोप न करता या जगात कोणीही परफेक्ट नसतं अशी शिकवण चित्रपटातून दिली आहे.

 

Related topics

You might also like