{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

गर्लफ्रेंड रिव्ह्यू – प्रमुख कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ही साधारण कथासुद्धा अधिक परिणाम साधते

Release Date: 26 Jul 2019 / Rated: U/A / 02hr 00min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:

Suyog Zore

लेखक-दिग्दर्शक उपेंद्र सिद्धये यांचा हा चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो.

एक काळ असा होता जेव्हा मराठीमध्ये रोमँटिक चित्रपट बनत नसत. पण शाळा (२०१२) आणि दुनियादारी (२०१३) या सारख्या चित्रपटांनी हे चित्र बदलून टाकले. शाळा मुळे मराठी चित्रपटाचा जणू चेहरामोहराच बदलून गेला आणि नुकतेच वयात आलेल्या मुलांच्या प्रेमकथा या विषयावर अनेक चित्रपट येऊ लागले.

सध्याच्या तरुण मुला-मुलींवर सतत रिलेशनशिप मध्ये राहण्याचं जे दडपण असतं आणि सिंगल असणं म्हणजे जणू गुन्हाच आहे असं भासवलं जातं त्यावर हा चित्रपट भाष्य करतो.

उपेंद्र सिद्धये दिग्दर्शित गर्लफ्रेंड मध्ये नचिकेत प्रधान (अमेय वाघ) या एकलकोंड्या युवकाची गोष्ट सांगितली आहे. नचिकेतला अजून पर्यंत एकही गर्लफ्रेंड नाही आणि याच साठी त्याचे सह-कर्मचारी आणि मित्र त्याची टिंगल उडवतात. त्याची जन्मतारीख सुद्धा १४ फेब्रुवारी आहे, पण १४ फेब्रुवारी ही जन्मतारीख असणे म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव असं त्याला वाटतं.

रिलेशनशिप मध्ये नसल्याच्या कारणावरून त्याचं प्रमोशन जेव्हा नाकारलं जातं तेव्हा मात्र नचिकेत ठरवतो की काहीही झाले तरी तो गर्लफ्रेंड मिळवणारच. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला गर्लफ्रेंड मिळते सुद्धा, पण ही अशक्यप्राय गोष्ट शक्य कशी झाली आणि गर्लफ्रेंड मिळवल्यानंतर पुढे काय होते हेच या चित्रपटाचे कथानक आहे.

जरी मराठीमध्ये हा विषय नवीन असला तरी कथेमध्ये जास्त नावीन्य नाही. एक एकलकोंडा मुलगा आहे, त्याचे खास मित्र अगोदरच रिलेशनशिप मध्ये आहेत, आईवडील त्याचं लग्न लावण्याच्या मागे आहेत आणि फक्त त्याच्यावर खार खाऊन असणारा एक बॉस आहे.

लेखक-दिग्दर्शक सिद्धये साधारण कथानकातून सुद्धा एक उत्तम चित्रपट बनवण्यात यशस्वी झाले आहेत. मेलोड्रामा आणि उपदेशपर संवाद टाळल्यामुळे चित्रपट अधिक प्रभावशाली होतो. रोमँटिक कॉमेडी असूनसुद्धा जेव्हा कधी चित्रपटात महत्वाचा इमोशनल सीन असतो तेव्हा योग्य परिणाम साधण्यासाठी योग्य तो वेळ दिला गेला आहे.

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांनी या अगोदर कधी एकत्र चित्रपटात काम केले नसले तरी त्यांची केमिस्ट्री पाहून असं बिल्कुल वाटत नाही. सई ताम्हणकर यांनी चित्रपटात आलिशा हे पात्र साकारले आहे. त्यांचा अभिनय उत्तम आहेच पण आलिशाच्या काही विचित्र सवयींचा चित्रपटाच्या कथानकात मात्र काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे आलिशाला त्या सवयी का आहेत यामागचं प्रयोजन कळत नाही.

अमेय वाघ यांनी मात्र आपली भूमिका अगदी उत्तम निभावली आहे. त्यांची शरीरयष्टी त्यांच्या पात्राला अगदी शोभून दिसते आणि त्यामुळे अवघडलेपण अधिक उठून दिसतं. काही सीन्समध्ये जेव्हा वाघ स्वतःशीच बोलत असतात ते सीन म्हणजे अभिनयकलेच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहेत. तुम्हाला नचिकेतबद्दल वाईट पण वाटते आणि त्याचवेळी हसू देखील आवरता येत नाही.

सर्वच सह-कलाकारांची उत्तम साथ मिळाली आहे. सुयोग्य गोर्हे आणि उदय नेने यांनी नचिकेतच्या मित्रांच्या भूमिका साकारल्या आहेत आणि दोघांनीही चांगला अभिनय केला आहे. यतीन कार्येकर आणि कविता लाड यांनी नचिकेतच्या पालकांची भूमिका साकारली आहे. अगदी कमी स्क्रीन टाइम असूनसुद्धा त्यांनी आपली छाप सोडली आहे.

सागर देशमुख चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतात. संपूर्ण चित्रपट त्यांचा फक्त एकच सीन आहे. सागर देशमुख सारख्या प्रतिभावान अभिनेत्याला इतक्या छोट्या भूमिकेसाठी निवडणे हे पचवणं थोडं कठीण जातं. इतर कोणताही कमी ताकदीचा अभिनेता घेतला असता तरी चित्रपटावर त्याचा काहीच विपरीत परिणाम झाला नसता.

संगीत ही चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू. ऋषिकेश-सौरभ-जसराज या त्रयीने एक श्रवणीय अल्बम बनवला आहे. सौरभ भालेराव यांचे पार्श्वसंगीत सुद्धा अत्यंत वेगळे आहे. मराठी चित्रपटांमध्ये सहसा आपल्याला अशा पद्धतीचे संगीत ऐकायला मिळत नाही.

छायाचित्रण देखील चांगले झाले आहे. वेशभूषा आणि कला दिग्दर्शन यामुळे चित्रपट अधिक प्रभाव पाडतो. २ तास १७ मिनिटाचा गर्लफ्रेंड १० मिनीटांनी लांबला मात्र खरा.

 

Related topics

You might also like