{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

डोक्याला शॉट रिव्ह्यू – चार विनोदी मित्रांमुळे हा चित्रपट पाहण्यालायक होतो

Release Date: 01 Mar 2019 / Rated: U/A / 02hr 02min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे हा एक पूर्ण विनोदी चित्रपट आहे जो अगदी शेवटपर्यंत तुम्हाला हसवत ठेवतो.

हिंदी सिनेमे सामान्यतः दक्षिण भारतीय ऍक्शन चित्रपटांचा रीमेक करतात परंतु मराठी सिनेमे मात्र रीमेकसाठी अगदी योग्य चित्रपट निवडतात. त्याची दोन उदाहरणे म्हणजे शटर (२०१४) आणि हाफ टीकेट (२०१६). हे दोनीही चित्रपट मल्याळम चित्रपट शटर (२०१२) आणि तमिळ चित्रपट काक् मुटइ (२०१५) चे रीमेक आहेत.

दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथीचा डोक्याला शॉट हा सुद्धा बालाजी थर्नीथरन दिग्दर्शित नाडूवूला कोंजम पक्कथा कानोम (२०१२) या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रीमेक आहे.

डोक्याला शॉट ही अभिजित (सुव्रत जोशी), जो आपली प्रेयसी सुभलक्ष्मी अय्यंगार बरोबर होणाऱ्या लग्नाच्या एक दिवस आधी एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकतो, अशा युवकाची कथा आहे.

अतिशय कष्टाने त्याने सुब्बूच्या पालकांचे त्यांच्या लग्नासाठी मन वळवले होते कारण तिच्या वडिलांना तिने तमिळ नसलेल्या मुला बरोबर लग्न करणे मान्य नव्हते. शेवटी सुब्बू, तिची आई आणि अभिजित या तिघांनी मिळून त्यांचे मन वळवले आणि आता लग्नाची तयारी चालू आहे.

लग्नाच्या एक दिवस आधी अभिजित आपल्या गण्या (गणेश पंडित), भज्जी (रोहित हळदीकर) आणि चंदू (ओमकार गोवर्धन) या तीन खास मित्रांबरोबर क्रिकेट खेळायचे ठरवतो. त्याच वेळी कॅच पकडताना खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागतो.

अभिजितला काही इजा झाली नसली तरी त्याला आता रेट्रोगेड अम्नेशिया म्हणजेच शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला आहे. अभिजित सुब्बूला फक्त २ महिन्या पूर्वीच भेटला असल्यामुळे त्याला तिच्याबद्दल काहीच लक्षात नाही.

अभिजितचे मित्र ही विचित्र स्थिती आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. आता तो लग्न करू शकेल का? हीच चित्रपटाची कथा आहे.

रेट्रोगेड अम्नेशिया हा एक गंभीर आजार आहे. जब तक है जान (२०१२) चित्रपटात पण शाह रुख खानला हाच आजार झाला होता.

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे हा एक पूर्ण विनोदी चित्रपट आहे जो अगदी शेवट पर्यंत तुम्हाला हसवत ठेवतो. कलाकारांच्या अगदी छोट्या छोट्या हातवाऱ्यातून सुद्धा तुम्हाला हा चित्रपट हसवत ठेवतो.

चित्रपटातील विनोद जरी मार्मिक आणि प्रासंगिक असले तरी त्या मध्ये या गंभीर आजारावर आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांवर कुठेही वाईट विनोद केले नाही आहेत.

चित्रपटात या चारही मित्रांची ओळख अगदी हुशारीने केली आहे. हे चारही मित्र स्वभावाने एकमेकां पासून पूर्ण भिन्न आहेत, पण तरीही त्यांच्यातला मैत्रीचा अतूट बंध आपल्याला जाणवतो.

जोशींना आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवण्याची संधी या चित्रपटातून मिळाली आहे. रेट्रोगेड अम्नेशिया ने बाधित तरीही विनोदी अशी अत्यंत कठीण भूमिका जोशींनी अगदी सहज निभावली आहे. त्यांच्या तीन मित्रां पैकी पंडित सर्वात जास्त विनोदी आहेत.

प्राजक्ता माळी चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या वाटेला आलेली भूमिका त्यांनी चांगली निभावली असली तरी त्यांना खूपच कमी स्क्रीन टाइम भेटला आहे.

या सर्व सकारत्मक गोष्टीं मुळे तुम्हाला चित्रपट आवडू लागतो परंतु क्लायमॅक्स येई पर्यंत चित्रपटाची गाडी रुळावरून घसरते. चित्रपटात एक लांबलचक लग्नाचा सीन आहे ज्यात हे चारही मात्र ज्या काही उचापत्या करतात त्या आपल्या तर्कशास्त्राचे सर्व नियम मोडून टाकतात.

हे सीन्स आपल्याला अनीस बजमीचा नो एन्ट्री (२००५) चित्रपटाची आठवण करून देतात. तो सीन जरी अत्यंत बालिश असला तरी त्या सीन मध्ये थोडे तरी लॉजिक होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो संपूर्ण चित्रपटच निर्बुद्ध मनोरंजनाच्या प्रकारात मोडणारा होता. पण डोक्याला शॉट हा निर्बुद्ध विनोदी प्रकारात मोडणारा चित्रपट बिलकुल नाही.

एक उत्तम कथानकाला योग्य न्याय मिळाला नाही. त्यामुळे इंटरव्हल पर्यंत तुमचे भरपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट इंटरव्हलनंतर मात्र फसतो. तरीही तुम्ही चित्रपट पाहायचा ठरवलं तर तुमची संपूर्ण निराशा होणार नाही.

 

Related topics

You might also like