{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

चोरीचा मामला रिव्ह्यू – जितेंद्र जोशींचा धमाल अभिनय आणि खुसखुशीत वाक्यांनी या कमकुवत कॉमेडी ऑफ एरर्सला तारले

Release Date: 31 Jan 2020 / Rated: U/A / 02hr 14min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Suyog Zore

प्रिदर्शन जाधव यांचा चोरीचा मामला कलाकारांच्या अभिनयावर अधिक अवलंबून आहे, मात्र कहाणी कमकुवत असल्याने कलाकारांचा अभिनय सुद्धा त्याला फार काळ वाचवू शकत नाही.

मराठी चित्रपटांचा एक काळ असा होता कि दोन-तीन कॉमेडी टाईमिंग असलेले कलाकार घ्यायचे, त्या अनुषंगाने कॉमेडी वन-लाइनर्स असलेली स्क्रिप्ट तयार करायची आणि विनोदी चित्रपट तयार व्हायचा. पण हा काळ तसा राहिलेला नाही. तरी सुद्धा दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी याच फॉर्मुल्याचा वापर करत मल्टीस्टारर चोरीचा मामला चित्रपट बनवलाय.

चोरीचा मामला हा डोकं बाजूला ठेवून बघायचा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचा एकूण पसारा हा नाटकासारखा आहे, ज्यात चार पात्र एका घरात विशिष्ट परिस्थितीत अडकतात आणि एकमेकांपासून काहीतरी लपवत असतात.

नंदन (जितेंद्र जोशी) एक प्रामाणिक चोर आहे, जो एका घरात चोरी करायला गेलेला असताना तिथेच अडकला जातो. त्याला प्रामाणिक चोर का म्हणायचं? याचं उत्तर चित्रपटात मिळेल.

घराचा मालक अमरजित पाटील (हेमंत ढोमे) हा राजकारणी आहे. गायिका बनायचं स्वप्न असणाऱ्या श्रद्धा (अमृता खानविलकर) ला तो घरी घेऊन येतो. अमरजितच्या बायकोला नवऱ्याचं बाहेर लफडं असण्याची शंका आहेच.

पहिल्या २० मिनिटात सगळ्या लॉजिकला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. नंदन घरात अडकला असून सुद्धा तिथून बाहेर पडण्याची संधी त्याला अनेकदा असते, पण काही मूर्ख कारणामुळे तो घरात थांबण्याचा निर्णय घेतो. नंदनच्या अशा काही सवयी आहेत ज्याचा वापर विनोदासाठी होतो, पण याचा अतिरेक होतोय हे दिग्दर्शक कुठे तरी विसरलेले दिसतात.

नंदनची बायको आशा (कीर्ती पेंढारकर) त्याची खूपच काळजी करते. नवऱ्याला उशीर झाला तर ती त्याला फोन करून विचारते, मात्र त्याच्या मोबाईलवर फोन करण्या ऐवजी ज्या घरात तो चोरी करायला गेलाय, तिथल्या लँडलाईनवर ती फोन करते. हा एक आणखी सब प्लॉट आहे जो खरंच विनोदी आहे, पण दिग्दर्शकाने त्याचा अतिरेक करत त्यातली मजा घालवली आहे. 

चित्रपटाची रचना नाटकासारखी आहे आणि कलाकार सुद्धा इथे नाटका सारखाच अभिनय करतात. चित्रपटात आंगिक अभिनयाची गरज होतीच आणि जितेंद्र जोशी व्यतिरिक्त इतर कुठल्या कलाकाराला ते जमलेले नाही. अमृता खानविलकर त्यांच्या भूमिकेत योग्य वाटत नाहीत. त्यांच्या पात्राकडून शारीरिक विनोद आणि विनोदाचं उत्तम टायमिंग अपेक्षित होतं, मात्र त्यात त्या कमी पडताना दिसतात. काही प्रसंगात त्या विनोद करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे प्रयत्न व्यर्थ होताहेत हे हि आपल्याला कळू लागतं. 

जितेंद्र जोशी आणि हेमंत ढोमे यांच्या मधली जुगलबंदी हि चित्रपटाची जमेची बाजू आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं कि चित्रपटाची पकड सैल होतेय, तेव्हा या दोघांची केमेस्ट्री ती वेळ तारून नेते. जोशी चित्रपटात कमाल करतात. त्यांच्या वन-लाइनर्स तुम्हाला हसवतात. काही जोक्स उत्तम आहेत, काहींचा प्रभाव पडत नाही, पण जोशींनी प्रत्येक हशा वसूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. 

बऱ्याच त्रुट्या असून सुद्धा हे हि मान्य करायला हवे कि हा चित्रपट अत्यंत विनोदी आहे, खास करून चित्रपटाचा पूर्वार्ध. काही दृश्यांमध्ये तर हसून हसून दमछाक होते. याचं क्रेडिट संवाद लेखक प्रियदर्शन जाधव आणि हरीश कस्पटे यांना द्यायला हवं.

पण मध्यंतरानंतर चित्रपट आपली पकड सोडतो. चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेली दोन गाणी चित्रपटाचा वेग कमी करतात. जोक्स मध्ये तोचतोचपणा येऊ लागतो आणि अनावश्यक उप कथानकामुळे चित्रपट रेंगाळतो. चित्रपटाचा कालावधी आणखी २० मिनिटे कमी असता आणि त्यात थोडं लॉजिक जोडलं असतं, तर चित्रपट खरंच मजेदार झाला असता. 

सिनेमॅटोग्राफी आणि प्रॉडक्शन डिझाईन बाबतीत इथे फारसा स्कोप नाही, कारण जास्तीत जास्त दृश्य हे एका घरात शूट झालेले आहेत. पण तरीही मर्यादित आणि उपलब्ध परिस्थितीत दोन्ही बाजू उत्तम सांभाळल्या गेल्या आहेत. प्रियदर्शन जाधव यांचे दिग्दर्शन ठीकठाक म्हणता येईल.

जर तुमच्याकडे या वीकेंडला फारसं काही करण्यासारखं नसेल आणि डोकं बाजूला ठेवून चित्रपट बघण्यात तुम्हाला आनंद वाटत असेल, तर चोरीचा मामला हा चांगला पर्याय आहे.

 

Related topics

You might also like