{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

छत्रपती शासन रिव्ह्यू – फक्त चांगला हेतू असल्याने उत्तम चित्रपट बनवता येत नाही

Release Date: 15 Mar 2019

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

संतोष जुवेकर, मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या छत्रपती शासन 'चांगला हेतू पण वाईट परिणाम' याचे उत्तम उदाहरण आहे.

छत्रपती शासन हा चित्रपट बनवण्या मागे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रेचा हेतू चांगलाच होता यात दुमत नाही. अनेक दशकांपासून राजकीय पक्ष आणि राजकारणी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मत मागत आहेत. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा कोणतीच माहिती न घेता फक्त राजकारण्यांची शिवाजी महाराजांवरची भाषणे ऐकून हुरळून जातात.

या चित्रपटात दाखवल्या प्रमाणे हे कार्यकर्ते स्वतःहून शिवाजी महाराजां विषयी कोणतीच माहिती शोधायचे कष्ट घेत नाहीत. जे त्यांचे पक्षप्रमुख बोलतील त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवतात.

छत्रपती शासन चे ओपनिंग क्रेडिट्स डोळे दिपवून टाकतात. शिवाजी महाराजांचे जन्मापासून शेवटपर्यंतचा आयुष्यप्रवास सॅण्ड आर्टच्या माध्यमातून दाखवला आहे. देऊळ (२०११) च्या ओपनिंग क्रेडिट्स साठी सुद्धा हीच आयडिया वापरली होती.

संपूर्ण चित्रपटात जर फक्त शिवाजी महाराजांचे आयुष्य असेच सॅण्ड आर्ट च्या माध्यमातून दाखवण्यात आले असते तर बरे झाले असते, कारण यानंतर आपण जे काही पाहतो त्याला आपण फारफार तर फिल्ममेकिंग चा केविलवाणा प्रयत्न म्हणू शकतो.

संतोष जुवेकर यांनी रणजित हे पात्र साकारले आहे. रणजित चित्रपटाचा नायक आहे. तो तिथल्या तहसीलदारचा खास माणूस आहे. स्वतःला शिवाजी महाराजांचे अनुयायी समजणारे कार्यकर्ते जसा पेहराव करतात तसाच पेहराव रणजितचा असतो. त्यामुळे त्याच्या घरात प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचे फोटो आहेत.

त्याच्या हाताखाली काम करणारे कार्यकर्ते सुद्धा शिवाजी महाराजांचे फोटो असलेल्या टी-शर्ट घालतात. रणजितची लहान मुलगी वाढदिवसाचा केक सुद्धा तलवारीने कापते आणि तिच्या वाढदिवसाचा शेवट होतो एका आयटम डान्स ने.

जुवेकर डॅशिंग दिसतात. आपले अभिनय कौशल्य सुद्धा दाखवायचा प्रयत्न केला आहे परंतु.त्यांच्या भूमिकेमध्ये अभिनयासाठी जास्त वाव नाही. आपल्याला रणजित बद्दल इतर काहीच माहिती पुरवली जात नाही तसेच तो तहसीलदाराच्या हाताखाली काम करून पण त्याच्याकडे इतके पैसे कुठून येतात याबाबद्दल पण काही खुलासा केलेला नाही.

प्रशांत मोहिते ने साकारलेली अमरची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. अमर हा भरकटलेला तरुण आहे ज्याला शिवाजी महाराजांबद्दल जे थोडेफार ज्ञान आहे ते सुद्धा राजकारण्यांच्या भाषणातून मिळालेलं आहे.

अमर चे कॉलेज मुख्याध्यापक डॉ समर (मकरंद देशपांडे) त्याला योग्य दिशा दाखवतात. ओपनिंग क्रेडिट व्यतिरिक्त चित्रपटातली ही एकमेव चांगली गोष्ट आहे.

परंतु अमरचे मुख्याध्यापका बरोबर सीन्स उगाच जास्त ताणलेत. अमरचे चित्रपटातील ध्येय अगदीच बालिश आहे. प्रशांत मोहिते गुणी अभिनेते आहेत. एका चांगल्या दिग्दर्शकाच्या योग्य मार्गदर्शनाखाली त्यांचा अभिनय अधिक निखरून येईल. 

देशपांडे कॉलेज मुख्याध्यापकाच्या भूमिकेत बिलकुल शोभत नाहीत. उलट त्यांच्या ट्रकभर स्वप्न (२०१८) या अत्यंत वाईट चित्रपटाच्या कटू आठवणी जाग्या होतात. क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली त्यांना स्लोमोशन मध्ये धाववलंय, ते पाहून हसायला येते.

चित्रपटाचे कथानक खूपच कमजोर आहे. चित्रपटात मध्येच काही पात्र येतात आणि काहीही इम्पॅक्ट न सोडता निघून जातात. क्लायमॅक्स पूर्वी एक प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न केला जातो पण त्याचा सुद्धा काही परिणाम होत नाही.

चित्रपटाचा २ तासापेक्षा जास्त रनिंग टाइम भरून काढण्यासाठी पटकथा उगाच ताणली आहे. किशोर कदम यांनी एका माथेफिरू व्यक्तीची भूमिका केली आहे ज्याचे चित्रपटात काही मोनोलॉग्स आहेत. हे मोनोलॉग्स तुमच्या सहनशक्तीचा अंतच पाहतात.

काही वेळाने तुमच्या लक्षात येते की कदमचे मोनोलॉग्स सुरु होताच तुम्ही थिएटरमधून बाहेर जाऊन एक मस्त फेरी मारून येऊ शकता. किशोर कदमच्या चाहत्याचे हे म्हणणे आहे, या वरून तुम्ही चित्रपट किती वाईट असेल याचा अंदाज लावू शकता.

 

Related topics

You might also like