{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

भाई उत्तरार्ध रिव्ह्यू – पु ल देशपांडे व पत्नी सुनीता यांच्यातील नाते जीवनपटाचा आधार

Release Date: 08 Feb 2019 / Rated: U / 02hr 10min

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Suparna Thombare

पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातसुद्धा पु लं च्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत. पण यावेळी त्यांच्या आयुष्यातल्या सामाजिक आणि राजकीय घटनांना जास्त महत्व आहे.

दुसऱ्या भागाची सुरुवात पुल देशपांडेंनी लिहलेल्या आणि भीमसेन जोशी यांनी गायलेल्या 'इंद्रायणी काठी' या गाण्याने होते. गाण्याबरोबर आपल्याला पहिल्या भागातले काही फोटो दाखवत दुसऱ्या भागाला सुरुवात होते.

कथानक फ्लॅशबॅक मध्ये पुढे सरकत जाते आणि इकडे हॉस्पिटलमध्ये देशपांडेंना भेटायला त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र येत असतात. भक्ती बर्वे, विजया मेहता, शिवसेना पक्षप्रमुख बाळ ठाकरे हे त्यातलीच काही नावे.

पहिल्या भागाप्रमाणे या भागात सुद्धा दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि पटकथालेखक गणेश मतकरी यांनी पुलंच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग चित्रपटात दाखवले आहेत.

पुन्हा एकदा पहिल्या भागाप्रमाणे या भागात सुद्धा भीमसेन जोशी (अजय पुरकर), वसंतराव देशपांडे (पद्मनाभ बिंड), कुमार गंधर्व (स्वानंद किरकिरे) आणि चंपा ताई (वीणा जामकर) यांची शास्त्रीय संगीताची बैठक हा चित्रपटातील सर्वात महत्वाचा सीन आहे.

या दृश्यातून आपल्याला चौघांमध्ये असलेल्या घट्ट मैत्रीचा अंदाज येतो. जेव्हा यापैकी एकाचा मृत्यू होतो तेव्हा आपण दोन भागांमध्ये पहिल्यांदा पु लं च्या डोळ्यात अश्रू पाहतो.

पहिल्या भागात पु लं च्या वयक्तिक आयुष्यावर जास्त भर दिला होता तर या भागात पुलंच्या आयुष्यातल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.

एका दृश्यात विजय तेंडुलकर पु लं वर त्यांच्या अवास्तविक लिखाणावर आणि मराठी व्यावसायिक नाट्यभूमीवर टीका करतात. पु लं स्वतः मान्य करतात की ते तेंडुलकरांसारखे सामाजिक विषयांवर लिखाण करू शकत नाहीत, पुढे ते तेंडुलकरांच्या लिखाणाची प्रशंसा सुद्धा करतात.

हा सीन चित्रपटात खूप महत्वाचा आहे कारण या दृश्यातून पु लं वर काही वैचारिक लोकांकडून होत असलेली टीका दाखवली आहे.

पु ल इतरांना आनंद देण्यासाठी लिहत असत. त्यांनी दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रात केलेली आर्थिक मदत आणि कुष्ठरोग्यांसाठी आयुष्यभर काम करणाऱ्या बाबा आमटे (संजय खापरे) बरोबर केलेले काम सुद्धा चित्रपटात दाखवले आहे. कुष्टरोगामुळे समाजातून बहिष्कृत केलेल्या मुलांबरोबर पु ल खेळत असताना भावुक होतात तो सीन खूप वेळ लक्षात राहील.

इंटरव्हल नंतर पु लं चे भारतीय राजकारणावरचे काही मते सुद्धा दाखवली आहेत. पु लं चे लिखाण कधीच राजकीय नव्हते, तरीही आणीबाणीच्या काळात त्यांनी काँग्रेसवर लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याबद्दल त्यांच्या भाषणांमधून हल्ला चढवला होता.

पण त्यानंतर त्यांनी जनता पार्टीची त्यांच्या पक्षात सामील होण्याची ऑफरसुद्धा नाकारली होती. या घटनेवरून पु लं च्या राजकीय दृष्टिकोनाचा अंदाज येतो.

जनता पक्षाची ऑफर धुडकावत ते म्हणाले, "मी एक मुखवटाधारी विदूषक आहे. जेव्हा कोणताही पक्ष सामान्य जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आम्ही हा मुखवटा काढू. तुमच्या पक्षाने सुद्धा असेच केले तर आम्ही पुन्हा मुखवटे काढून आमची मते मांडू."

रत्नाकर मतकरींचे संवाददेखील पहिल्या भागापेक्षा अधिक प्रभावशाली आहेत. एकेकाळचा आपला विद्यार्थी बाळ ठाकरेंना पु लं नी जाहीर सभेमध्ये हुकूमशाह म्हटले होते तर एकदा आपल्या पत्नी सुनीताबरोबर बोलत असताना त्यांनी बाळासाहेबांना उद्धट व्यक्ती म्हणून संबोधले होते. यावरून आपल्याला पु लं च्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच जेव्हा हॉस्पटिलमध्ये उपस्थित लोक सुनीता बाईं (शुभांगी दामले) यांना घरी जाऊन आराम करण्याची विनंती करतात तेव्हा सुनीता बाई म्हणतात जर कोणत्या वैज्ञानिक चमत्काराने भाई (पु लं ना सर्व याच टोपणनावाने संबोधत) यांचे प्राण वाचले तर मी त्यांच्या बाजूला नाही हे पाहून त्यांना काळजी वाटेल.

सुनीता बाईंचा पु लं ना असलेला सपोर्ट आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते मतकरींनी आपल्या लिखाणातून उत्तम दाखवले आहे आणि या सीन्समुळे चित्रपट आणखी प्रभावशाली होतो. कारण ही दोघांमधल्या नात्याचा एकेक पदर उलगडणारी दृश्ये वगळली तर इतर चित्रपटात पु लं च्या आयुष्यातल्या काही मोजक्याच घटना दाखवल्या आहेत. त्यामुळे हे सीन्स चित्रपटासाठी खूप महत्वाचे आहेत.

मांजरेकर आपल्याला पु लं च्या जीवनप्रवासात बाबा आमटे सोबत केलेले सामाजिक कार्य, दूरदर्शनवरील त्यांचे काम, त्यांच्या राजकीय विचारधारा या सर्व गोष्टी दाखवतात पण या सर्वाना बांधून ठेवणारा मुख्य धागा म्हणजे पु ल आणि सुनीताबाई यांचे पती-पत्नीचे प्रेमळ नाते.

बाकीच्या कलाकारांचा अभिनय साधारण असला तरी सागर देशमुख आणि इरावती हर्षे त्यांच्या भूमिकेला अनेक कंगोरे जोडतात.

मांजरेकर पु ल देशपांडेंना अलौकिक अष्टपैलू व्यक्ती म्हणून आपल्यासमोर उभे करतात जे ते खऱ्या आयुष्यात पण होते. शिक्षक, हार्मोनियम वादक, संगीतकार, गीतकार, लेखक, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशी पु लं ची अनेक रूपे मांजरेकर आपल्याला दाखवतात. पण ते पती म्हणून कसे होते हे सुनीताबाईंच्या नजरेतून दाखवण्यातसुद्धा मांजरेकर यशस्वी झाले आहेत.

जरी हा जीवनपट उत्कृष्ट चित्रपट नसला तरी मांजरेकर या जीवनपटातून आपल्याला पु लं ची महाराष्ट्राचे सांस्कृतिक आयकॉन म्हणून ओळख करून देतात.

 

Related topics

You might also like