सदर चित्रपट झी५ वर उपलब्ध आहे. चित्रपटगृहात ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मशिदींवरून भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत सांगितलेली आहे.
राज ठाकरेंच्या मनसेचे सहकारी करताहेत अजानच्या भोंग्यावर आधारित भोंगा चित्रपटाची प्रस्तुती
मुंबई - 22 Apr 2022 1:00 IST
Updated : 27 Apr 2022 0:45 IST
Our Correspondent
शिवाजी लोटन पाटील यांचा भोंगा (२०२१) हा सामाजिक चित्रपट मागील वर्षी झी५ वर प्रदर्शित झाला. आता ३ मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. मुस्लिम समाजात मशिदीतून अजान देताना उपयोगात येणाऱ्या भोंग्यावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.
भोंगा चित्रपटाला आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने पाठिंबा दिला आहे. अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे या पक्ष सदस्यांनी अभिनेते अमोल कागणे यांच्यासोबत या चित्रपटाच्या प्रस्तुतीची जबाबदारी उचललेली आहे.
ठाकरे यांनी मशिदीतुन भोंग्यांमधून देण्यात येणाऱ्या अजानचा मुद्दा उचलून धरला आहे. याबाबतीत त्यांनी सरकारला मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंत मुदत जाहीर केलेली आहे. असे घडले नाही तर अशा मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. काही पक्ष कार्यकर्त्यांनी काही ठिकाणांवर अशा प्रकारचे प्रदर्शन सुरु सुद्धा केले आहे.
यावर्षी भारतात ईद-ऊल-फित्र ३ मे ला साजरा होणार आहे.
भोंगा सध्या झी५ वर उपलब्ध आहे. यापूर्वी मनसे किंवा पक्षाचे कार्यकर्ते या चित्रपटाशी कुठल्याही प्रकारे संबंधित नव्हते. त्यामुळे ओटीटीच्या प्रदर्शनाच्या ७ महिन्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करणे ही एक राजकीय खेळी आहे, असे म्हणायला वाव आहे.
भोंगा मध्ये कागणे सोबत दीप्ती धोत्रे, कपिल कांबळे गुडसूरकर आणि श्रीपाद जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Related topics