News Marathi

सुव्रत जोशी आणि हृता दुर्गुळे दोन प्रोजेक्ट मध्ये एकत्र

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जॉबलेस या वेब-सिरीजमध्ये जोशी मुख्य भूमिकेत होते.

सुव्रत जोशी आणि हृता दुर्गुळे

सुव्रत जोशी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब-सिरीज जॉबलेस मध्ये आपल्याला दिसले होते. आता हृता दुर्गुळे यांच्या बरोबर त्यांचे दोन प्रोजेक्ट्स येत आहेत.

दुर्गुळे अनन्या या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात त्यांच्या भावाची भूमिका जोशी साकारत आहेत. दोघे कलाकार एका वेब-सिरीज मध्ये सुद्धा एकत्र आहेत, मात्र येथे ते नायक-नायिकेच्या भूमिकेत दिसतील.

"अनन्या मध्ये आम्ही ज्या व्यक्तिरेखा साकारतोय, त्यापेक्षा या व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळ्या आहेत. हा शो फक्त दोन व्यक्तिरेखेभोवती फिरतो," जोशी यांनी सिनेस्तानशी बोलताना सांगितले.

जोशी यांची साहाय्यक भूमिका असलेला आणखी एक मराठी चित्रपट येत आहे, ज्याचे नाव अजून जाहीर केलेले नाही. "मी साहाय्यक भूमिकेत जरी असलो तरी मला या चित्रपटाची शैली आवडली. हा लहान मुलांवर केंद्रित असलेला चित्रपट आहे. याचे दोन भाग आहेत आणि लंडन मधील कुटुंबाची हि कथा आहे," त्यांनी सांगितले.

जॉबलेस नंतर प्लॅनेट मराठीच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात जोशी दिसतील. सायली संजीव या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. "ती एक खूप गोड गोष्ट आहे. हा चित्रपट लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जॉबलेस पेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे. जॉबलेस मधला नायक शहरात राहतो. हा चित्रपट गावातील एका साध्या कुटुंबाची गोष्ट आहे," त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, "फॉल पिको स्पेशलिस्ट असलेला तरुण आणि फुल विकणाऱ्या तरुणीची हो गोष्ट आहे. दोघे खूप साधे आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. जॉबलेस जेवढा डार्क आहे, तेवढाच हा चित्रपट गोड आहे. दोन्ही व्यक्तिरेखा दोन विरुद्ध टोकाच्या आहेत."

प्लॅनेट मराठीचे नुकतेच भव्य लॉन्चिंग झाले. या प्लॅटफॉर्म विषयी जोशी म्हणाले, "दीड वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठी फक्त एक फिल्म कंपनी होती. स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माण करणे हि एक मोठी झेप आहे. संपूर्ण टीमसोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांचं यश शब्दात मांडणं कठीण आहे. आपल्या मोठ्या भावाला यश मिळालं तर आपल्याला कसं वाटेल, तसं आहे हे. या प्लॅटफॉर्मला लोकांचं प्रेम मिळेल याबाबत मला खात्री आहे. आम्हाला अशा प्लॅटफॉर्मची गरज होतीच."