९ नोव्हेंबरला ४६वा वाढदिवस साजरा करणारे अभिनेते सुबोध भावे यांनी एक विशेष घोषणा केली. विश्वास जोशी यांच्या आगामी फुलराणी या चित्रपटात भावे काम करत आहेत याची माहिती त्यांनी दिली.
भावे यांनी इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे ब्लॅक अँड व्हाईट मोशन पोस्टर टाकले. यात भावे आणि एक स्त्री कलाकार दिसत आहेत, मात्र स्त्री कलाकार इथे पाठमोरी उभी आहे.
यात शीर्षक भूमिकेत कोण स्त्री कलाकार काम करतेय याबाबत निर्मात्यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही.
इंस्टग्राम पोस्ट मध्ये भावे यांनी लिहिले कि चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे.
हि भूमिका स्वीकारण्याचे कारण सांगताना भावे म्हणाले, "प्रत्येक भूमिकेने मला वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे. मी नेहमी चौकटीच्या बाहेरची भूमिका स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी मला फुलराणीची गोष्ट आणि माझ्या भूमिकेविषयी सांगितले, मी लगेच हो म्हटले."
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिगमेलियन या नाटकाचा आधुनिक अवतार म्हणजे फुलराणी हा चित्रपट होय. गुरु ठाकूर आणि जोशी यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. चित्रपटाचे शीर्षक पु ल देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकावरून घेतले आहे. हे नाटक सुद्धा शॉ यांच्या नाटकावर आधारित होते.
फाईनक्राफ्ट मीडिया अँड एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत फुलराणीची निर्मिती हर्षवर्धन साबळे, जाई जोशी आणि अमृता राव यांनी केली आहे.