अमेय वाघ आणि ललित प्रभाकर अभिनित झोंबिवलीची प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. कोविड-१९ मुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले होते. आदित्य सरपोतदार चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ ला प्रदर्शित होईल.
चित्रपटाच्या नव्या पोस्टर सोबत प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली. वाघ आणि प्रभाकर जखमी आणि त्रस्त अवस्थेत पोस्टरवर दिसत आहेत आणि मागे अनेक झोंबी दिसत आहेत.
झोंबी कॉमेडी प्रकारामध्ये झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे. गेल्या वर्षी पहिल्या लॉकडाऊननंतर झोंबिवलीच्या चित्रीकरणानेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला होता. आधी हा चित्रपट यावर्षी ३० एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले.
इंस्टाग्रामवर लाईव्ह कार्यक्रमात दिग्दर्शक सरपोतदार यांनी सांगितले कि हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याबाबत ते निश्चयी होते. "बरीच मंडळी आम्हाला सोशल मीडियावर विचारात होती कि आम्ही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याच्या विचारात आहोत का, मात्र चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शनाबाबतीत आम्ही आग्रही होतो," ते म्हणाले. "झोंबिवली असा चित्रपट आहे जो तुमच्या मित्र परिवारासोबत चित्रपटगृहात बघण्यात खरी मजा आहे. जर तुम्ही याला तुमच्या स्मार्टफोनवर किंवा लॅपटॉपवर बघाल तर तुम्हाला तो अनुभव येणार नाही."
यूडली फिल्म्स निर्मित झोंबिवलीमध्ये वैदेही परशुरामी आणि तृप्ती खामकर सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.