ट्रेलर मध्ये खेड्यात राहणाऱ्या मध्यम वयीन रामजीवर कोसळलेले दुःख समोर येते, ज्याचा तरुण मुलगा मरण पावलाय.
दिठी ट्रेलर – दिवंगत सुमित्रा भावे यांची दुःखाच्या अटळतेची गोष्ट अखेर प्रेक्षकांसमोर
मुंबई - 12 May 2021 19:10 IST
Updated : 20 May 2021 15:11 IST
Shriram Iyengar
दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा पहिला एकल दिग्दर्शकीय चित्रपट दिठी (२०२१) सोनी लिव या ओटीटी मंचावर २१ मे ला प्रदर्शित होतोय. दुर्दैवाने हाच त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
किशोर कदम, मोहन आगाशे, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारखी दिग्गज मंडळी या चित्रपटात आहेत. दुःख आणि त्यामधून बाहेर पडण्याचा संघर्ष असा गंभीर विषय चित्रपटात मांडण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये आपल्याला खेड्यात राहणारा मध्यम वयीन रामजी दिसतो, ज्याने आपला तरुण मुलगा गमावलाय. आता त्याच्या मागे मुलाची गर्भवती बायको आहे आणि दुःखातून सावरण्याचा रामजीचा संघर्ष सुरु आहे.
धर्म आणि कामात स्वतःला गुंतवून ठेवून या दुःखातून बाहेर पडण्याचा रामजीचा प्रयत्न सुरु आहे, मात्र गावातील इतर लोकांना रामजीचे त्यांच्या नित्य बैठकीत नसणे पटत नाही, कारण कुठल्याही समस्येवर रामजी त्यांचा एकमेव आधार होता.
अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भावे यांचे १९ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि सामाजिक रीती, संस्कृती यांना मानवीय दृष्टिकोनातून दाखवण्याची स्वतःची अशी शैली त्यांनी विकसित केली होती. सुनील सुकथनकर यांच्या सोबत दिग्दर्शनाची जोडी बनवत त्यांनी दोघी (१९९५), देवराई (२००४), अस्तु! (२०१४) आणि कासव (२०१७) अशा चित्रपटांद्वारे अनेक पुरस्कार पटकावले.
दिठी हा भावे यांचा एकल दिग्दर्शिका म्हणून पहिलाच चित्रपट होता. तसेच डिजिटल माध्यमात प्रदर्शित होणारा हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. यात त्यांच्या चित्रपटात दिसणारे अनेक ओळखीचे चेहरे आहेत, त्यापैकी एक म्हणजे आगाशे. त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली आहे.
ट्रेलर येथे पहा आणि आम्हाला सांगा तुम्हाला हा चित्रपट पाहायला आवडेल का?
Related topics
SonyLIV Trailer review