प्रसिद्ध संगीतकार जोडी राम लक्ष्मण मधील लक्ष्मण अर्थात विजय पाटील यांचे त्यांच्या नागपूर या जन्मस्थळी २२ मे ला वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. १९७० च्या दशकात पाटील यांनी सुरेंद्र हेंद्रे यांच्यासोबत संगीतकार म्हणून आपली जोडी जमवली आणि या जोडीला रॅम लक्ष्मण हे नाव दिले. दादा कोंडकेंच्या मराठी चित्रपटांमधून त्यांनी पहिल्यांदा यश मिळवले आणि पुढे हिंदी चित्रपटात सुद्धा दीपक बाहरी आणि सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांमधून मोठे यश मिळवले.
दारिद्र्य ते यश, कीर्ती, श्रीमंती असा पाटील यांचा जीवन प्रवास अनोखा आहे. तरुण वयात ते मुंबईत आले, त्यावेळी त्यांचा कुणीही गॉडफादर नव्हता. कौशल्य, निष्ठा आणि कठोर मेहनतीच्या बळावर त्यांनी आपले स्थान मिळवले. वडील काशिनाथ आणि काका प्रल्हाद यांच्या कडून संगीताचे प्रार्थमिक धडे घेतल्यानंतर त्यांनी भातखंडे संगीत शिक्षण संस्था, नागपूर, येथे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार (१९७५), तुमचं आमचं जमलं (१९७६) आणि राम राम गंगाराम (१९७७) या सारख्या सुपरहिट चित्रपटांना यशस्वी संगीत दिल्यानंतर हिंदी मधील पहिला ब्रेक त्यांना राजश्री प्रॉडक्शनच्या एजेंट विनोद (१९७७) या चित्रपटासाठी मिळाला. या चित्रपटात महेंद्र संधू मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट साइन केल्यानंतर काही दिवसातच हेंद्रे यांचे निधन झाले. पण आपल्या मित्राच्या आठवणीत पाटील यांनी राम लक्ष्मण हे नाव कायम ठेवत चित्रपटांना संगीत देणे सुरु ठेवले.
सिनेस्तानला दिलेल्या मुलाखतीमध्ये लक्ष्मण यांचे सुपुत्र अमर पाटील यांनी आपल्या वडिलांच्या करिअर बद्दल आणि आयुष्याबद्दल वडिलांकडून काय शिकायला मिळाले याबद्दल सांगितले.
तुमच्या वडिलांचं आणि त्यांच्या गुणवत्तेचं वर्णन तुम्ही कसं कराल?
ते अत्यंत थोड्या गरजा असलेले साधे व्यक्ती होते. ते धार्मिक, देवावर श्रद्धा असलेले माणूस होते. त्यांच्या आसपासच्या लोकांवर ते भरपूर माया करायचे आणि त्यांची काळजी सुद्धा घ्यायचे. ते अतिशय विनम्र आणि नागपूरच्या एका साध्या कुटुंबातून होते. लहानपणापासूनच त्यांना संगीतकार व्हायचे होते.
मुंबईत ते १९६२-६३ मध्ये आले. तेव्हा ते २० किंवा २१ वर्षांचे होते. सुरुवातीला त्यांनी बराच संघर्ष केला पण नंतर देवाच्या कृपेने त्यांनी स्वतःचं नाव कमावलं. त्यांच्या उतरत्या वयात आम्ही त्यांना परत त्यांच्या मुळाकडे म्हणजे नागपूरला आणले. असं म्हणतात कि एकदा माणूस त्याच्या मुळापासून लांब गेला कि परत कधी येत नाही. पण देवाच्या कृपेने ते परत येऊ शकले.
लक्ष्मण यांचा मुलगा म्हणून तुमचे बालपण कसे होते?
मी माझ्या वडिलांचे जवळून निरीक्षण केले आहे. जेव्हा मी लहान होतो, ते मला त्यांच्या म्युझिक सेशन्ससाठी घेऊन जायचे. कधी कधी लोकं म्युझिक सेशन्ससाठी घरी यायचे आणि मी त्यांचं निरीक्षण करायचो. मी संगीताचं प्रात्यक्षिक शिकू लागलो, निर्माता-दिग्दर्शकांसोबत कसं वागायचं ते बघू लागलो, गायकांना ते कसे विश्वासात घेत, गीतकार आणि त्यांच्या साथीदारांवर ते किती प्रेम करायचे हे सगळं मी बघितलंय. मी अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यांच्याकडून शिकलोय कि ज्याचा मला पुढे भरपूर उपयोग झाला. ते माझ्यासाठी मित्रासारखेच होते. फक्त त्यांचं निरीक्षण करून मी त्यांचे अनेक चांगले गुण अंगिकारले.
मी नशीबवान आहे कि माझ्या वडिलांना पुरस्कार आणि ओळख मिळताना मी पाहू शकलोय. एक मुलगा म्हणून तुमचा हिरो तुमच्या जवळच असतो. मी ते प्रत्येक क्षण साठवून ठेवले आहेत. मी त्यांना संघर्ष करताना, नंतर यश मिळताना आणि नंतर शांत, समाधानी जगताना पाहिलंय. माझ्या वडिलांनी मला पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे आधी चांगला माणूस बनावं.
सुरेंद्र हेंद्रे सोबत त्यांच्या संबंधांविषयी आम्हाला सांगा. ते कसे भेटले आणि राम आणि लक्ष्मण ही नावं कशी ठेवली?
मुंबईत आल्यानंतर बाबा छोट्या समारंभांना आणि कार्यक्रमात संगीताचे कार्यक्रम करू लागले. अशाच एका कार्यक्रमात ते सुरेंद्र काकांना भेटले. पुढे ते राम बनले आणि माझे बाबा लक्ष्मण. ही नावं दादा कोंडके यांनी दिली. त्यांच्यामधील घनिष्टता वाढू लागली आणि दोघांमध्ये स्नेह वाढू लागला. दोघांची बऱ्याच गोष्टींमध्ये एकवाक्यता असायची. सुरेंद्र काकांना सुद्धा संगीतकार व्हायचं होतं.
पण ते फक्त काही काळ आपले स्वप्न जगू शकले. एजेंट विनोद (१९७७) साठी पहिलं गाणं ध्वनिमुद्रित केल्या नंतर त्यांचं निधन झालं. त्यांच्या पहिल्या मराठी आणि पहिल्या हिंदी चित्रपटानंतर राम लक्ष्मण या नावाने जे संगीत देण्यात आले ते एकट्या माझ्या बाबांनी संगीतबद्ध केलेलं आहे. त्यांनी राम लक्ष्मण या जोडीची आठवण कायम ठेवली.
राम लक्ष्मण या नावाने संगीत देत राहणे हा त्यांनी घेतलेला विचारी आणि मनाला स्पर्श करून जाणारा निर्णय होता.
आम्ही सगळे मुळातच प्रेमळ माणसं आहोत आणि आम्ही मोठ्यांचा आदर करतो. आमच्या संस्कृतीमध्ये लक्ष्मण राम शिवाय असूच शकत नाही. हेच प्रेम आणि आदर माझ्या बाबांनी नेहमी जपलंय. फक्त लक्ष्मण या नावाने संगीत देणे हे माझ्या बाबांच्या दृष्टीने योग्य नव्हतं. जर राम हा शब्द वापरला तरंच ते पूर्ण वाटू शकतं. जरी ते शरीर रूपाने सोबत नसले, तरी ते नेहमी माझ्या बाबांच्या बरोबर होते.
मग दादा कोंडके यांनी त्यांना कसं निवडलं आणि पांडू हवालदार हा चित्रपट कसा दिला?
हि साधारण १९७४ ची गोष्ट आहे. मुंबईच्या षण्मुखानंद हॉल मध्ये मधुमतीजी आणि त्यांचे पती मनोहर दीपक यांच्या तर्फे एक सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या शो मध्ये माझे बाबा प्रमुख वादक होते. काही कारणामुळे गायक हॉलवर वेळेत पोहचू शकले नाही. कार्यक्रमाला उशीर होत असल्याने प्रेक्षक कंटाळले होते. मधुमतीजींनी बाबांना कार्यक्रम सुरु करण्यास सांगितले. बाबा म्हणाले कि ते सुरु करतील पण त्यांच्या परवानगीने त्यांना त्यांची गाणी सादर करायची आहेत.
बाबांनी स्वतःची गाणी सादर केली. सुदैवाने दादा कोंडके पहिल्या काही ओळीतच बसले होते. त्यांनी बाबांचं निरीक्षण केलं आणि मध्यांतरी बाबांना आणि सुरेंद्र काकांना दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं. ही तीच वेळ जेव्हा त्यांनी पांडू हवालदारचं संगीत करण्याची ऑफर दोघांना दिली. ते म्हणाले मराठी चित्रपटांच्या अनेक नामवंत संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलंय पण त्यांना या दोघांना त्यांच्या प्रॉडक्शनचा भाग बनवायचं आहे.
अशा प्रकारे त्यांना दादा कोंडके यांच्या बरोबर पहिला चित्रपट मिळाला आणि दादांनी त्यांना राम लक्ष्मण हे नाव दिले. पांडू हवालदार ते दादा कोंडके यांच्या निधनापर्यंत (१९९८) त्यांचे निर्माता आणि संगीतकार या पलीकडे एकमेकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते एकमेकांचे मित्र बनले. बाबांनी १९७४ पासून १९९८ पर्यंत दादा कोंडके यांच्या २५ चित्रपटांना संगीत दिले. या दरम्यान फक्त एकाच चित्रपटाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाबा संगीत दिग्दर्शक नव्हते.
तुमच्या वडिलांचे राजश्री प्रॉडक्शन सोबत सुद्धा बरीच वर्ष चांगले संबंध राहिलेले आहेत.
बाबांनी राजश्री सोबत १५ चित्रपट केले आहेत. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा राजश्री मध्ये संगीताविषयी बैठक केली, तेव्हा ताराचंद बडजात्याजी आणि राजकुमार बडजात्याजी यांसोबत त्याकाळचे बरेच मोठे दिग्दर्शक तिथे उपस्थित होते. ही बैठक पाच ते सहा तास चालली. ते सगळे मंत्रमुग्ध झाले होते.
तिथे दीपक बाहरी हे युवा दिग्दर्शक सुद्धा हजर होते. त्यांना एक वेगळा चित्रपट बनवायचा होता. तो एक ऍक्शन चित्रपट होता, जेम्स बॉण्डच्या फिल्म्स च्या धर्तीवर. त्यांनी ताराचंद बडजात्यांना सांगितले कि ते राम लक्ष्मण सोबत काम करण्यास उत्सुक आहेत. अशा प्रकारे बाबांना राजश्रीचा पहिला चित्रपट एजेंट विनोद मिळाला आणि या बॅनर सोबत त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर त्यांनी तराणा (१९७९), हम से बढकर कौन (१९८१), उस्तादी उस्ताद से (१९८२), हम से है जमाना (१९८३) इत्यादी असे चित्रपट केले. एकाच दिग्दर्शकासोबत त्यांनी १० चित्रपट केले आणि सगळे संगीताच्या बाबतीत हिट ठरले.
सूरज बडजात्या सोबत त्यांचा प्रवास कसा सुरु झाला?
सूरज बडजात्यांच्या मैने प्यार किया (१९८९) मुळे त्यांच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरु झाला. बाबांनी सूरजजींना मोठं होताना पाहिलंय. सूरजजी आणि बाबांमध्ये जसे मित्रत्वाचे संबंध होते तसेच ते वडील आणि मुलाच्या नात्याचेही होते. त्यांनी बालपणापासून बाबांना पाहिले होते, त्यामुळे त्यांना राम लक्ष्मण यांच्या संगीताविषयी पूर्ण माहिती होती. त्यांच्या संबंधामुळेच मैने प्यार किया, हम आपके हैं कौन..! (१९९४) आणि हम साथ साथ हैं (१९९९) सारखे सुंदर म्युझिकल चित्रपट तयार झाले.
राम लक्ष्मण असे संगीतकार होते कि जे त्यांना समजू शकले त्यांनी त्यांच्याकडून भरभरून घेतले. त्यांना लोकांना कुठलं संगीत आवडेल याची पूर्ण माहिती होती. गरज होती ती फक्त योग्य व्यक्तीने ते वापरण्याची. ज्यांना हे शक्य झालं त्यांनी बाबांसोबत उत्तम काम केलं.
तुमच्या वडिलांचा अमर-विजय या नावाने ऑर्केस्ट्रा सुद्धा होता. तो कसा तयार झाला?
ज्यावेळी हा ऑर्केस्ट्रा तयार झाला तेव्हा मी फार लहान होतो. बाबा संगीतकार होण्या आधीचा हा काळ होता. तो पुढे सुद्धा चालू राहिला. संगीतकार म्हणून बाबा संपूर्ण महाराष्ट्रात, मध्य भारत आणि दक्षिणेत सुद्धा शो करायचे. माझी आई सुद्धा यात सहभागी व्हायची. ती प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना होती. तिने मुकेशजी, मन्ना-दा [डे] इत्यादींबरोबर काम केले होते. आई-बाबांनी हा ऑर्केस्ट्रा सुरु केला होता. त्यांनी माझ्या आणि बाबांच्या नावाने अमर-विजय हे नाव ठेवले.
एवढ्या वर्षात तुमच्या वडिलांनी अनेक गायकांबरोबर काम केले आहे. त्यांचे कोणी आवडते गायक होते का?
ते प्रत्येकच गायकाबरोबर आनंदाने काम करायचे. त्यांची विचारसरणीच वेगळी होती. गायकांकडून ते सहज चांगलं गाणं गाऊन घ्यायचे. त्यांना काय हवंय हे त्यांना पक्क माहित असायचं. गायकांकडून खूप सारखे टेक्स घेऊन चांगल्यात चांगलं गाणं गाऊन घेण्याच्या प्रयत्नात ते नसायचे. त्यांना कुठल्याच गायकांकडून कुठलीच समस्या नव्हती.
त्यांनी [मोहम्मद] रफी साहेब, किशोर-दा [कुमार], लता दीदी [मंगेशकर], आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकरजी, शैलेंद्र सिंह, भूपिंदर सिंह, एस पी बालसुब्रमण्यन, येसूदास, चित्रा, उदित नारायण, कुमार शानू, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, कुणाल गांजावाला, शान, सुनिधी चौहान, शंकर महादेवन इत्यादी अशा अनेक दिग्गज गायकांबरोबर गाणी केली आहेत.
जेव्हा बाबांची तब्येत बरी नसायची, तेव्हा आम्ही जेवल्यानंतर रोज एक दीड तास त्यांच्या संगीतावर चर्चा करण्यात रंगायचो. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळायचं. मी त्यांना सांगायचो कि जेव्हा जेव्हा त्यांचे गाणे वाजतात, तेव्हा तेव्हा लोकांना कळतं कि हे राम लक्ष्मण यांचं संगीत आहे, तेच त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे.