News Marathi

प्लॅनेट मराठीच्या अनुराधा मधून संजय जाधव करताहेत ओटीटी मध्ये पदार्पण

ह्या शो मध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार आणि सुकन्या कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत.

तेजस्विनी पंडित, संजय जाधव आणि सचित पाटील अनुराधाच्या क्र्यु समवेत

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव आता अनुराधा मधून वेब-सिरीजच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार आणि सुकन्या कुलकर्णी या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हि सिरीज प्रदर्शित होईल.

जाधव यांनी म्हटले, "सध्या मी फार काही सांगू शकत नाही. मात्र एवढं सांगेन कि हि सिरीज एक सस्पेन्स थ्रिलर आहे ज्यात मी परिघाबाहेर जाऊन काहीतरी वेगळं केलंय. मला आनंद आहे कि हा शो पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीवर होतोय.

"अनुराधाचे संपूर्ण कलाकार उत्तम आहेत. तेजस्विनीसोबत ह्या आधी मी भरपूर काम केलंय. ती एक गुणवान अभिनेत्री आहे जी कुठल्याही व्यक्तिरेखेला उत्तम न्याय देऊ शकते. मला तिची काम करण्याची पद्धत माहित असल्यामुळे आमच्यात एक सहजपणा आहे ज्यामुळे काम करणं सोपं होतं."

प्लॅनेट मराठीचे संस्थापक आणि मॅनेजिंग डिरेक्टर अक्षय बर्दापूरकर यांनी जाधव यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव व्यक्त करताना सांगितले, "आमच्यासाठी हि मोठी गोष्ट आहे कि संजय जाधव दिग्दर्शित अनुराधा आमच्या प्लॅटफॉर्मवर येत आहे. त्यांचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करून गेलेत आणि विविध मनोरंजक विषय हाताळण्यासाठी ते ओळखले जातात. त्यामुळे अनुराधाला सुद्धा प्रेक्षकांचे प्रेम मिळेल. ह्या शोमध्ये मराठी इंडस्ट्रीचे उत्तम कलाकार आहेत. प्लॅनेट मराठी आणि विस्टा मीडिया कॅपिटल प्रेक्षकांसाठी उच्च दर्जाचे कॉन्टेन्ट आणण्यासाठी कटिबद्ध आहे."