News Marathi

३० जूनला जूनच्या प्रदर्शनासोबत होणार प्लॅनेट मराठी ओटीटीचा शुभारंभ

औरंगाबाद शहराच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे. सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित जूनची प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे ब्यास अभिनित हा चित्रपट ३० जूनला प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित होतोय.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सोबतीनेच प्लॅनेट मराठी ओटीटीचे सुद्धा लॉंचिंग करण्यात येत आहे. या ओटीटीच्या माध्यमातून मराठी चित्रपट, वेब-सिरीज तसेच नाटकांना नवा मंच मिळणार आहे.

चित्रपटकर्त्यांनुसार जून हे अशा दोन व्यक्तिरेखांची गोष्ट आहे जे स्वतःच्या आयुष्याच्या आव्हानांशी झगडत असताना एकाकी राहिलेत, मात्र एकमेकांच्या सहवासात त्यांना त्यांचं पूर्णत्व गवसतं.

चित्रपटकर्त्यांच्या निवेदनानुसार, "५१ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्ये इंडियन पॅनोरामा विभागात जून निवडला गेला होता. पुणे फिल्म फेस्टिवल आणि न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल सारख्या नामांकित फेस्टिवलमध्ये चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. नेहा पेंडसे ब्यास आणि सिद्धार्थ मेनन यांना सर्वोत्तम अभिनयासाठी नामांकनं सुद्धा मिळाली आहेत, तर सिद्धार्थ मेनन यांना न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये पारितोषिक सुद्धा मिळालंय."

जूनचे लेखन निखिल महाजन यांनी केलंय. पुणे ५२ (२०१३) आणि नेटफ्लिक्सवरील हॉरर वेब-सिरीज बेताल (२०२०) यासाठी महाजन ओळखले जातात. अभिनेते जितेंद्र जोशी तसेच महाजन यांनी चित्रपटाचे गीत लेखन केले आहे. जोशी यांनी चित्रपटात काम सुद्धा केले आहे.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक, चेयरमॅन आणि मॅनेजिंग डिरेक्टर अक्षय बर्दापूरकर म्हणाले, "निखिल महाजन यांची गोष्ट आणि वैभव आणि सुहृद यांचे दिग्दर्शन यातून एक समृद्ध करणारा आणि समाधान देणारा चित्रपट साकार झालाय. प्लॅनेट मराठी ओटीटी, पहिले आणि संपूर्णपणे मराठीसाठी असलेले एकमेव ओटीटी, आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे. हा चित्रपट माझ्या फार जवळचा आहे कारण या चित्रपटाचे चित्रीकरण औरंगाबाद शहरात झाले आहे आणि हे शहर माझे जन्मस्थान आहे."

ते पुढे म्हणाले, "या काळात प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घ्यायचाय, मात्र ते जाऊ शकत नाहीत. प्लॅनेट मराठी ओटीटीने चित्रपट बघण्याचा हा आनंद त्यांच्या गॅजेट मध्ये आणला आहे. प्रत्येकाला पूर्ण महिना किंवा वर्षभरासाठी सबस्क्राईब करायला आवडत असेल असं नाही. असे लोक तिकीट घेऊन ४८ तास कितीही वेळा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील."

चित्रपटकर्त्यांनी ट्रेलर द्वारे प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर केली आहे.