News Hindi

ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे ९९व्या वर्षी निधन

आपल्या श्रेष्ठ अभिनयातून अभिनयाचे स्वतंत्र विद्यापीठ बनलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर खार, मुंबई, येथील हिंदुजा इस्पितळात दम्याच्या आजारावर उपचार सुरु होते.

चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असलेले दिलीप कुमार यांना गेल्या काही वर्षांपासून वृद्धापकाळातील आजारांनी ग्रासले होते. आज सकाळी ७.३० वाजता खार, मुंबई, येथील हिंदुजा इस्पितळात त्यांचे निधन झाले. पद्म विभूषण प्राप्त असे हे अभिनेते ९८ वर्षांचे होते.

दिलीप कुमार यांचे प्रवक्ते फैसल फारुकी यांनी सोशल मीडियावर या बद्दल माहिती दिली.

गेल्या काही वर्षांपासून दिलीप कुमार यांचे इस्पितळात जाणे येणे व्हायचे. ६ जूनला त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला आणि त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर अनेक नामवंत लोकांनी त्यांना भेट दिली.

मुहम्मद युसूफ खान असे त्यांचे मूळ नाव होते. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तर-पश्चिम सीमा प्रांतात जन्मलेल्या दिलीप कुमार यांनी ज्वार भाटा (१९४४) या चित्रपटातून पदार्पण केले आणि पुढे १९५० आणि १९६० च्या दशकात ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठ्या स्टार्स पैकी एक होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात राज कपूर आणि देव आनंद सोबत दिलीप कुमार अशा त्रिमूर्तीने इंडस्ट्रीचे नेतृत्व केले. अंदाज (१९४९), दाग (१९५२), देवदास (१९५५), मुघले आजम (१९६०), गंगा जमना (१९६१) या आणि अशा अनेक चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी पुढील पिढ्यांसाठी एक वस्तुपाठ घडवून दिला.

दिलीप कुमार फिल्मफेयर अवॉर्डच्या सुरुवातीचे मानकरी होते आणि शाहरुख खान यांच्या सोबत सर्वात जास्त (आठ) फिल्मफेयर अवॉर्ड्सचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे.

दिलीप कुमार यांना १९९१ मध्ये पद्म भूषण, २०१५ मध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्म विभूषण याने गौरवण्यात आले होते. पाकिस्तानातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशाण-ए-इम्तियाज मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत.

१९९१ मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. २००० ते २००६ ते राज्यसभेचे सभासद होते आणि १९७९ ते १९८२ या काळात मुंबई शहराचे शेरीफ होते.

त्यांच्या पश्चात ५५ वर्षे त्यांच्या पत्नी म्हणून सोबत राहिलेल्या सायरा बानू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून शोक प्रकट केला आहे.