गेल्या काही वर्षात मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेच्या सुरुवातीला म्हणजेच अजानच्या वेळेस भोंग्यांचा वापर यावरून बरीच वादळं उठली आहेत. काहींनी भोंग्यांच्या वापरावर बंदी घालण्याची सुद्धा मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अजान हा श्रद्धेचा भाग आहे, त्यासाठी वापरलेलं साधन नव्हे.
तरी सुद्धा अनेक धार्मिक संघटनांनी भोंग्याचा वापर महत्वाचे आहे असे म्हटले आहे. शिवाजी लोटन पाटील यांचा भोंगा चित्रपट याच विषयावर प्रकाश टाकतो.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीजरमधून हेच दिसून येतं कि भोंग्याच्या वापरावरून गावकऱ्यांमध्ये कसा तणाव निर्माण होतो.
कपिल गुडसूरकर यांनी एका मुस्लिम तरुणाची भूमिका साकारली आहे, जो देवळात काम करतो. मात्र त्याची सर्वसमावेशक भूमिका त्याच्या समाजातील काही वरिष्ठांना पटत नाही. जेव्हा तो अजानच्या वेळेस भोंयांचा वापर हा मुद्दा उपस्थित करतो, तेव्हा सगळे त्याला धिक्कारतात आणि त्याच्या धर्मावर असलेल्या श्रद्धेवर प्रश्न करतात. लवकरच परिस्थिती गंभीर होत जाते आणि या वादात संपूर्ण गाव सहभागी होतं.
या छोट्याश्या टीजर मध्ये हे स्पष्ट होत नाही कि गावकऱ्यांना भोंग्याची दिशा का बदलायची आहे. मात्र निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात असं म्हटलंय कि हि गोष्ट एका नऊ वर्षाच्या मुलाभोवती फिरते, ज्याला हायपोक्झिक इस्किमिक इन्सेफलोपॅथी आजार झालाय. हा एक प्रकारचा मेंदूचा आजार आहे, जो नवजात बालकांमध्ये प्राणवायूची कमतरता आणि मर्यादित रक्त पुरवठा यामुळे आढळतो. त्याच्या अशा अवस्थेमुळे शेजारील मशिदीतून येणाऱ्या अजानच्या आवाजाचा त्याला त्रास होतो.
या सामाजिक चित्रपटाला २०१९ मध्ये सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अमोल कागणे, श्रीपाद जोशी आणि दीप्ती धोत्रे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.
भोंगाची निर्मिती अमोल कागणे फिल्म्सने केली आहे. २४ सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. टीजर येथे पहा आणि आम्हाला सांगा, तुम्ही हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का?