वर्ष २००४ मध्ये गँगस्टर आणि रेपिस्ट भरत कालिचरण उर्फ अक्कू यादव याचा २०० दलित महिलांनी खून केला. या घटनेच्या नंतरचे पडसाद काय यावर सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित झी५ वरील २०० – हल्ला हो चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटात वरिष्ठ अभिनेते अमोल पालेकर एका निवृत्त व्यायाधिशाची भूमिका साकारत आहेत, जे एका तपास समितीचे अध्यक्ष आहेत.
चित्रपटाच्या ऑनलाईन पत्रकार परिषदेच्या वेळेस पालेकर म्हणाले कि या चित्रपटात ज्याप्रकारे जात हा विषय हाताळण्यात आला आहे, हे बघून ते प्रभावित झाले. "आपल्या चित्रपटात आपण नेहमी जातीविषयी बोलणे टाळतो किंवा ती अदृश्य स्वरूपात दिसत राहते, अर्थात काही अपवाद आहेतच. या स्क्रिप्टविषयी मला एक गोष्ट आवडली, ती म्हणजे यात कुठलेही आढेवेढे न घेता थेट विषयाला हात घालण्यात आला आहे," ते म्हणाले.
त्यांनी म्हटले कि या चित्रपटात स्त्रियांच्या विषयाला खुलेपणाने दाखवण्यात आले आहे. "आपण शोषित आणि सामाजिक स्तरावर पीडित स्त्रियांविषयी सुद्धा बोलणं टाळतो. मात्र इथे यापासून दूर पळण्यापेक्षा त्यालाच चित्रपटाचा गाभा केला आहे. हा चित्रपट त्यांच्या सार्वजनिक आंदोलनास समर्पित आहे, असं मी म्हणेन. जातीय अत्याचार आणि पुरुषसत्ताक पद्धतीच्या दबावाला बळी न पडण्याच्या त्यांच्या धैर्याला समर्पित आहे. सोबतच या विषयाशी निगडित असल्याचा कुठलाही बडेजाव इथे नाही," त्यांनी सांगितले.
साहिल खट्टर चित्रपटात बल्ली चौधरी हे पात्र साकारत आहेत. अक्कू यादववर आधारित असे हे पात्र आहे.
रिंकू राजगुरू, बरून सोबती, सलोनी बत्रा आणि उपेंद्र लिमये हे सुद्धा चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.
हा चित्रपट त्यांनी का स्वीकारला, यावर पालेकर बोलले, "हे स्त्रियांच्या विजयाचं ठराविक पद्धतीने केलेलं चित्रण नाही. हे सत्य घटनांवर आधारित आहे. ज्या पद्धतीने या सत्य घटनांचं आकलन यात दाखवलं आहे, ते मला आवडलं. म्हणूनच मी लगेच होकार दिला."
पालेकरांची व्यक्तिरेखा दलित वर्गातील आहे. "दलित म्हणून हे पात्र अनेक अडचणींना सामोरं गेलं आहे. तो अशा स्थितीपर्यंत येतो कि त्याचं दलित कार्ड तो वापरत नाही. त्याचं प्रदर्शन तो करत नाही. त्यामुळे तो जातीच्या मुद्यापलीकडे गेला आहे. मात्र तो फक्त एक मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही," ते म्हणाले.
२०० – हल्ला हो २० ऑगस्टला प्रदर्शित होईल.