{ Page-Title / Story-Title }

News Marathi

नाटककार आणि समीक्षक जयंत पवार यांचे ६१व्या वर्षी निधन

Read in: English


अधांतर हे त्यांचे प्रसिद्ध नाटक. महेश मांजरेकर यांचा लालबाग परळ (२०१०) हा चित्रपट याच नाटकावर आधारित होता.

जयंत पवार यांच्या फेसबुक अकाउंटवरून

Our Correspondent

प्रसिद्ध नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे २९ ऑगस्ट रोजी मुंबईत निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.

पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, पत्रकार आणि लेखिका संध्या नरे, आणि मुलगी असा परिवार आहे.

पवार यांना २०१२ साली फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या त्यांच्या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे घेतल्या जाणाऱ्या नाट्य लेखन स्पर्धेत त्यांना काय डेंजर वारा सुटलाय या नाटकासाठी सर्वोत्तम लेखकाचा पुरस्कार मिळाला होता. अधांतर, दरवेशी, पाऊलखुणा आणि माझे घर असे त्यांचे इतर लेखन सुद्धा प्रसिद्ध आहेत.

वर्ष २०१० मध्ये त्यांच्या अधांतर या नाटकावर आधारित लालबाग परळ हा चित्रपट प्रदर्शित झाला. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९८०च्या दशकात मुंबईमधील गिरणी कामगारांचे झालेले हाल हा या चित्रपटाचा मुख्य विषय होता.

पवारांनी तिचा उंबरठा (२०१६) या चित्रपटाचे सुद्धा लेखन केले होते. हा चित्रपट सुद्धा त्यांचे माझे घर या लेखनावर आधारित होता. इट्स ब्रेकिंग न्यूज (२००७) या हिंदी चित्रपटाचे सुद्धा त्यांनी लेखन केले होते.

वर्ष १९८६ मध्ये पवारांनी चंदेरी या मासिकामध्ये नाट्य समीक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. पुढे त्यांनी आपलं महानगर, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता ह्या वर्तमानपत्रांसाठी लेखन केले. मोरी निंद नसानी होय हा त्यांचा कथासंग्रह २०१५ साली प्रसिद्ध झाला. 

Related topics