फास्टर फेणे (२०१७) भा रा भागवत यांच्या पुस्तकांवर आधारित होता. अमेय वाघ यांनी चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली होती.
फास्टर फेणे सिक्वलच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे, सांगताहेत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार
मुंबई - 31 Mar 2020 16:19 IST
Updated : 06 Apr 2020 5:02 IST
Suyog Zore
मराठी साहित्यात भा रा भागवत यांचं फास्टर फेणे हे पात्र अत्यंत गाजलेलं आहे. तीन वर्षां पूर्वी आदित्य सरपोतदार यांनी या साहित्यिक पात्राला घेऊन फास्टर फेणे (२०१७) हा चित्रपट बनवला. चित्रपटात अमेय वाघ यांनी शीर्षक भूमिका साकारली होती आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला. गिरीश कुलकर्णी यांनी चित्रपटात नकारात्मक भूमिका निभावली होती.
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शकांनी या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याची इच्छा जाहीर केली होती. दोन वर्षांनंतर सिनेस्तानशी बोलताना सरपोतदारांनी याला दुजोरा दिलाय.
"क्षितिज (पटवर्धन) आणि मी सिक्वलच्या स्क्रिप्टवर काम करतोय. आम्हाला सध्याच्या काळात हा चित्रपट घडवायचा आहे आणि आजच्या सामाजिक विषयांना धरून हा चित्रपट असेल. तुम्हाला आठवत असेल, पहिल्या चित्रपटात आम्ही शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दाखवलाय. उत्तर प्रदेश आणि बिहार मधील एमबीबीएस परीक्षेमध्ये झालेल्या स्कॅमवर तो बेतला होता. त्यात मार्कांमध्ये फेरफार करण्यात आले होते. हे संपूर्ण भारतात होत असते," दिग्दर्शकांनी सांगितले.
सरपोतदारांना वाटतं कि हा मुद्दा आता जुना झालाय आणि सिक्वल मध्ये त्यांना काही तरी वेगळं मांडायचंय. "आम्ही पहिल्या चित्रपटात शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार दाखवला होता आणि आता आम्हाला वेगळा सामाजिक मुद्दा मांडायचा आहे आणि त्यावर आम्ही काम करतोय. या वर्षा अखेर प्री-प्रॉडक्शन संपेल. आशा करतो कि पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. पण एक गोष्ट नक्की, फास्टर फेणेचा सिक्वल येईल," ते म्हणाले.
सरपोतदार त्यांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या तयारीत सुद्धा आहेत. थोडी थोडी सी मनमानियां (२०१७) त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला हिंदी चित्रपट होय. "मी एका हिंदी चित्रपटाचं सुद्धा दिग्दर्शन करतोय. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी प्रॉडक्शन हाऊस तर्फे याची निर्मिती होतेय. या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन वर मागील एका वर्षापासून काम सुरु आहे. लॉकडाऊन संपताच या चित्रपटाचं शूटिंग सुरु होईल. सध्या मी एवढंच सांगू शकतो कि हा एक मोठ्या स्तरावरचा व्यावसायिक चित्रपट आहे," त्यांनी सांगितलं.
Related topics