News Marathi

उमेश कामत यांनी डॉ पी एस रामाणींची बायोपिक ताठ कणा याचे शूटिंग केले पूर्ण

मुंबईतील लीलावती इस्पितळात कार्यरत असलेले डॉ रामाणी प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत.

हिंदी चित्रपटांमध्ये बायोपिकचा ट्रेंड सध्या जोरात आहे. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा आणि... डॉ काशिनाथ घाणेकर (२०१८ ), भाई – व्यक्ती आणि वल्ली (२०१९), ठाकरे (२०१९) इत्यादी चित्रपटांनी हा ट्रेंड कायम ठेवलाय.

वरील उल्लेखित व्यक्ती विविध क्षेत्रातली प्रसिद्ध नावं आहेत. आता डॉ प्रेमानंद शांताराम रामाणी उर्फ पी एस रामाणी यांच्यावर बायोपिक बनतेय. दासबाबू दिग्दर्शित या चित्रपटाचे शीर्षक ताठ कणा असे आहे आणि अभिनेते उमेश कामत यात शीर्षक भूमिकेत काम करताहेत.

चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, "मी नुकतंच डॉ पी एस रामाणी यांच्या बायोपिकचं शूटिंग पूर्ण केलंय. ते फार मोठे न्यूरोसर्जन आहेत. शूटिंग संपलं आणि पुढे लॉकडाऊन जाहीर झालं. चित्रपटाचं पोस्ट-प्रॉडक्शन बाकी आहे."

आणि काय हवं? या वेब-सीरीजच्या दुसऱ्या सीजनविषयी बोलताना त्यांनी हि माहिती दिली.

डॉ पी एस रामाणी भारतातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. न्यूरोस्पायनल सर्जरी टेकनिक ज्याला पीएलआयएफ (पोस्टीरियर लम्बर इंटरबॉडी फ्युजन) रामाणी टेकनिक म्हणून ओळखलं जातं, त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते मूळचे गोव्यातील आहेत, पण सध्या मुंबईतील लीलावती इस्पितळात न्यूरोस्पायनल सर्जन म्हणून वयाच्या ८१व्या वर्षीही कार्यरत आहेत. दर वर्षी त्यांच्या नावे गोव्यामध्ये डॉ पी एस रामाणी मॅरेथॉन आयोजित केला जातो.

कामत यांनी सांगितले कि ते आणखी एका प्रोजेक्टवर काम करत आहेत, मात्र त्याविषयी ते योग्य वेळी सांगतील.