प्रिया बापट आणि उमेश कामत हि खऱ्या आयुष्यातील जोडी जुई आणि साकेतच्या रूपात परतले आहेत. एमएक्स प्लेयर वरील वरुण नार्वेकर दिग्दर्शित आणि काय हवं? या वेब-सीरीजच्या दुसऱ्या सीजन मध्ये जुई आणि साकेतच्या आयुष्यातील घटनांची मजेदार आणि गमतीशीर मांडणी बघायला मिळेल.
आमच्यासोबत झालेल्या विशेष चर्चेत बापट म्हणाल्या, "आता लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. पहिल्या सीजन मध्ये जुई आणि साकेतचं नुकतंच लग्न झालं होतं. तीन वर्षानंतर त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. पहिल्या सीजन मध्ये जिथे बाह्य गोष्टींना म्हणजे त्यांचं पहिलं घर, पहिली कार यांना महत्व होतं, त्याउलट या सीजन मध्ये त्यांच्या नात्याची गोष्ट उलगडली जाणार आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतं यावर हा सीजन बेतलेला आहे."
बापट पुढे म्हणाल्या, "मला वाटतं प्रत्येक एपिसोड मधून काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे. आपण प्रत्येकच जण अशा परिस्थिती मधून गेलेलो असतो, त्यामुळे ते छानही वाटतं आणि आपण त्याच्याशी स्वतःला जोडूनही घेऊ शकतो. हि आपल्या घरातलीच गोष्ट आहे."
या सीजनची आणखी वेगळी गोष्ट म्हणजे यात फक्त बापट आणि कामत काम करत नाहीयेत. "या सीजन मध्ये इतरही पात्र आहेत. मला वाटतं आम्हाला हा मोकळा श्वास आहे. त्यांच्या आयुष्यात फक्त ते दोघेच नसू शकतात. काही माणसं आहेत जी येत राहतात. मला ते फार मजेशीर वाटतं. आणि जेव्हा तुमच्यासोबत उत्तम कलावंत असतात, तेव्हा कामाचा आनंद वेगळाच असतो," त्या म्हणाल्या.
बापट म्हणाल्या कि तोच सेटअप असल्यामुळे शूटिंग करताना मजा आली. "वरुण आणि उमेश बरोबर काम करताना नेहमीच मजा येते. सोबत रेडिओ मिर्ची आमचे निर्माते आहेत. त्यामुळे अशा चांगल्या टीम सोबत काम करताना मजा हि येते आणि ते सोपं हि असतं. कुठलाच तणाव नव्हता," त्या म्हणाल्या.
कुठलंही प्रोजेक्ट निवडताना स्क्रिप्ट हे त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. "उत्तम स्क्रिप्ट हाच एकमेव निकष आहे. जर स्क्रिप्ट मजेदार नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मला वाटतं एक चांगला दिग्दर्शक तुमच्याकडे चांगलंच स्क्रिप्ट घेऊन येतो," त्या म्हणाल्या.
बापट यांचे पुढचे प्रोजेक्ट्स कोरोना व्हायरसमुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन आणि इंडस्ट्रीच्या बंद मुळे थांबले आहेत. "जेव्हा शूटिंग सुरु होतील तेव्हाच पुढच्या चित्रपटाचं शूटिंग कधी आहे ते कळू शकेल," त्या म्हणाल्या.
राज्य आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीने सद्य परिस्थितीशी सामना करताहेत, त्यासाठी त्यांचं कौतुक व्हायला हवं असं त्यांना वाटतं. "त्यांच्या कामाचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपले अधिकारी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळताहेत त्याचा मला गर्व आहे. ते उत्तम काम करताहेत," बापट म्हणाल्या.
आणि काय हवं? चा दुसरा सीजन २१ मार्च पासून एमएक्स प्लेयरवर दर्शवला जातोय. पहिल्या सीजन प्रमाणेच दुसरा सीजन सुद्धा सहा भागांचा आहे.