हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश स्कूल कॉलेज आणि लाईफ (२०२०) या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहेत. प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
तेजस्वीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हि बातमी दिली. "रोहित शेट्टी सर मला मेंटॉर म्हणून मिळणे याचा मला अभिमान वाटतो आणि त्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. रोहित शेट्टींच्या पहिल्या मराठी चित्रपटातून म्हणजे स्कूल कॉलेज आणि लाईफ मधून मला नायिकेची भूमिका मिळणं यामुळे आमचा बंध अधिक दृढ झालाय," त्या म्हणाल्या.
तेजस्वीने स्वरागिणी, पेहरेदार पिया कि आणि रिश्ता लिखेंगे हम नया अशा मालिकांमधून काम केले आहे. सध्या त्या टेलिव्हिजन रियॅलिटी शो खतरों के खिलाडी मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून काम करताहेत आणि रोहित शेट्टी या शोचे सूत्र संचालक आहेत.
तेजस्वीने चित्रपटामधील एका दृश्याचे छायाचित्र सुद्धा पोस्ट केले ज्यात त्या नायक करण किशोर परब बरोबर दिसताहेत. परब यांचा सुद्धा हा पहिलाच चित्रपट आहे.
स्कूल कॉलेज आणि लाईफ च्या कथानकाबद्दल कुठलीही माहिती अजून समोर आलेली नसली तरी शीर्षक वाचून एवढं तर नक्कीच कळतं कि हा चित्रपट विद्यार्थ्यांभोवती फिरतो. चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केलंय. त्यांचा सुद्धा हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी २०१४ मध्ये पुकार या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे आणि काही चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
स्कूल कॉलेज आणि लाईफ या उन्हाळ्यात प्रदर्शित होईल.