News Marathi

कोरोना व्हायरस – मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत फॅन्सना जागरूक करण्यासाठी एकजुट

अभिनेते स्वप्नील जोशी यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ टाकलाय. यात चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत सहभागी झालेत.

कोरोना व्हायरस पॅनडेमिकशी लढण्यासाठी फॅन्सना जागरूक करण्याच्या हेतूने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलावंत एकत्र आले आहेत.

या कलावंतांनी एका व्हिडीओ मधून लोकांना संदेश दिलाय. अभिनेते स्वप्नील जोशींनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकलाय.

जोशीं व्यतिरिक्त या व्हिडीओ मध्ये सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, रवी जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, प्रसाद ओक, अभिजीत खांडकेकर, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सचिन पिळगावकर यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवलाय.

कोविड-१९ ज्या वेगाने जगभरात पसरतोय त्याला या व्हिडिओमध्ये अधोरेखित केले गेलंय, सोबतच आरोग्य विभागाचे तसेच सरकारी यंत्रणेचे अनेक अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस त्यांच्या परीने सर्वोत्तम काम करीत आहेत हे सुद्धा सांगण्यात आले आहे. कलावंतांनी लोकांना स्वच्छता, पोषक आहार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्यतोपरी घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.

अमेय वाघ यांनी सांगितलंय कि हल्लीच ते विदेशातून परतले आणि म्हणून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय आणि येणाऱ्या दिवसात ते घरीच थांबणार आहेत. कलावंतांनी हे सुद्धा सांगितले कि जर कुणाला सर्दी किंवा खोकला झाला असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावं आणि छोटी मुलं आणि वयस्क माणसं यांची विशेष काळजी घ्यावी.

मुक्ता बर्वे यांनी लोकांना पाळीव प्राण्यांना टाकून देऊ नका, असे आवाहन केले. अशा काही अफवा पसरत आहेत कि नॉवेल कोरोना व्हायरस पाळीव प्राण्यांमधून पसरतो.

२४ मार्चच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात पुढचे २१ दिवस लॉकडाऊन घोषित केले आहे.