वेब-सीरीज आणि काय हवं? च्या दुसऱ्या सीजनमधून प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी पुन्हा एकदा परतली आहे. दुसऱ्या सीजनचे दिग्दर्शन सुद्धा वरुण नार्वेकर यांनीच केले आहे आणि खऱ्या आयुष्यातील या जोडीचा या सीजनमधला मनोरंजक प्रवास तसाच पुढे दाखवण्यात आलाय.
आणि काय हवं? चा दुसरा सीजन पहिल्यापेक्षा अधिक गमतीदार वाटतोय. ट्रेलरच्या पहिल्या दृश्यापासूनच याची खात्री पटते, ज्यात कुठलाही संवाद नाही आणि तरी सुद्धा तो मजेशीर आहे. पण इथला विनोद स्लॅपस्टिक नसून प्रासंगिक आणि स्वाभाविक आहे.
निर्मात्यांनी दुसऱ्या सीजनच्या सहा भागांमध्ये दडलेल्या गोष्टीचा कुठलाच पदर जाणून बुजून उलगडलेला नाही. जुई आणि साकेत मधील छोटासा संभाषण बघायला मिळतं. त्यातून कुठलाही संदर्भ लागत नसला, तरी मनोरंजन मात्र नक्कीच होतं.
याचं श्रेय बापट आणि कामत यांच्या स्वाभाविक अभिनयाला द्यायला हवं. पहिल्या सीजनमध्ये खऱ्या आयुष्यातील जोडीला निवडण्याची युक्ती चालली आणि दुसऱ्या सीजनमध्ये सुद्धा ती चालेल ते इथे कळतंय.
अमेय वाघ आणि मिथिला पालकर अभिनित मुरांबा (२०१७) नंतर वरुण नार्वेकर यांनी आणि काय हवं? या सीरीजचे दिग्दर्शन केले होते. आणि काय हवं? (सीजन २) २१ मार्चपासून एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होतोय. ट्रेलर येथे पहा आणि हि सीरीज बघायची कि नाही ते तुम्हीच ठरवा.