खऱ्या आयुष्यात नवरा-बायको असलेले उमेश कामत आणि प्रिया बापट या जोडीने गेल्या वर्षी आणि काय हवं? या वेब-सीरीज मध्ये एकत्र काम केलं होतं. आत या सीरीजचा दुसरा सीजन शनिवार २१ मार्च पासून एमएक्स प्लेयर वर दाखवण्यात येतोय. पहिल्या सीजन प्रमाणेच दुसऱ्या सीजनचे दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले आहे.
बापट आणि कामत पहिल्या सीजनचेच पात्र, अनुक्रमे जुई आणि साकेत, साकारत आहेत. दोघे नवरा बायकोच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातील घडामोडी या सीरीजमध्ये बघायला मिळतात. "त्यांचं वैवाहिक आयुष्य जसं जुनं होत जातं, जुई आणि साकेतच्या आयुष्यातील नव्या घडामोडींमुळे त्यांचे बंध अधिक घट्ट होत जातात," अधिकृत निवेदनात सांगण्यात आले.
बापट यांनी अधिक विस्तारित रूपात सांगितले, "जुई आणि साकेत कुठल्याही इतर लग्न झालेल्या जोडप्या सारखे आहेत आणि या भागांमध्ये घडणाऱ्या घटना या तुमच्या नात्यात कुठल्यातरी एका टप्प्यावर घडलेल्या असतीलच."
आपल्या पत्नीसोबत पुन्हा एकदा काम करताना कामत यांना आनंदच झालाय. "प्रिया आणि मी सीजन १ मुळे ७ वर्षानंतर स्क्रीनवर पुन्हा एकत्र काम केलं आणि सीजन २ इतक्या लवकर करायला मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. हे पात्रं आमच्या फार जवळचे आहेत आणि त्यांचा साधेपणा आणि सोज्वळता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल जसे ते मला स्पर्श करून गेले आहेत," त्यांनी म्हटलं.
बापट आणि कामत यांनी यापूर्वी टाइम प्लिज (२०१३) या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
या सीजनमध्ये काय बघायला मिळेल, यावर नार्वेकर म्हणाले, "लग्न हे एक आयुष्यभराचं साहस आहे आणि जुई-साकेतच्या नात्यामधून आम्ही आयुष्याच्या छोट्या मोठ्या आनंदाचे क्षण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक दिवसाच्या छोट्या क्षणांमध्ये सुख दडलेलं असतं असा माझा विश्वास आहे आणि या सीरीजमध्ये आम्ही तेच अधोरेखित केलंय."
पहिल्या सीजन प्रमाणे दुसरा सीजन सुद्धा सहा भागांचाच आहे.