ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक लीलाधर कांबळी यांचे मुंबईतील एका इस्पितळात २ जुलैला निधन झाले. गेली दोन वर्ष ते कँसरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. ते ८३ वर्षांचे होते.
कांबळी यांनी नाटकापासून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली आणि ३० पेक्षा अधिक नाटकातून काम केले. हिमालयाची सावली, काचेचा चंद्र, कस्तुरी मृग, प्रेमा तुझा रंग कसा, शॉर्टकट, दुभंग, लेकुरे उदंड झाली, वस्त्रहरण आणि वात्रट मेले हि त्यांची काही गाजलेली नाटकं होती.
त्यांनी फनी थिंग कॉल्ड प्ले या इंग्रजी नाटकातही काम केले होते. विशेष म्हणजे या नाटकाचे २०० हुन अधिक प्रयोग झाले, जे इंग्रजी नाटकात अभावानेच बघायला मिळते.
नाटका व्यतिरिक्त कांबळी यांनी जब्बार पटेल यांच्या सिंहासन (१९७९), संदीप सावंत यांच्या श्वास (२००४) आणि महेश टिळेकर यांच्या वन रूम किचन (२०११) अशा काही गाजलेल्या चित्रपटांमधूनही काम केले होते.
नाट्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आलं होतं.
कांबळी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुली आणि नातवंडं असा परिवार आहे.