कबीर खान यांच्या ८३ चित्रपटामध्ये संदीप पाटील यांच्या भूमिकेसाठी कलाकाराची झालेली निवड खास आहे. संदीप पाटील यांचे सुपुत्र, अभिनेता चिराग पाटील, यांची वडिलांच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
संदीप पाटील एक स्फोटक फलंदाज होते. त्या काळात त्यांच्या शैलीत खेळणारे खेळाडू दुर्मिळ होते. फास्टर असो व स्पिनर, ते त्यांच्या मोठ्या शॉट्ससाठी ओळखले जायचे. मध्यमगती गोलंदाज म्हणून सुद्धा ते उपयुक्त होते. मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
१९८३ च्या क्रिकेट विश्व कपमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात त्यांनी ३२ चेंडूत ५१ धावा काढल्या आणि भारताला फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या या खेळीचा भरपूर फायदा झाला.
चित्रपटाच्या फेसबुक पेज वर संदीप पाटील यांचे पोस्टर टाकण्यात आले, ज्यात चिराग उंच ड्राइव्ह मारताना दिसताहेत. संदीप पाटील यांचा हा आवडता शॉट होता. पोस्टर सोबत लिहिलेले आहे, 'देखणा स्फोटक फलंदाज जो विरुद्ध टीमला उधळून लावतो. सादर करीत आहोत मुंबईचं वादळ.'
संदीप पाटील मागच्या आठवड्यात चर्चेत होते. त्याचं कारण म्हणजे एका इव्हेंटमध्ये ते तरुण मुलांना सनस्क्रीन न वापरण्याचा सल्ला देत होते. त्यांनी भारतीय टीमचा सध्याचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा सुद्धा उल्लेख केला होता. "हे असले प्रकार बंद करा. हार्दिक पंड्या सारखं करू नका," त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचं नेटिझन्सना आश्चर्य वाटलं.
चिराग पाटील १० वर्षांपासून अभिनय करीत आहेत. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामं केले आहे. सचिन कुंडलकर यांचा प्रिया बापट आणि सई ताम्हणकर अभिनित वजनदार (२०१६) हा चित्रपट त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक आहे.
८३ चित्रपटात आणखी एका कलाकाराने आपल्या खेळाडू पित्याची भूमिका साकारली आहे. माल्कम मार्शल या वेस्ट इंडीजच्या खेळाडूची भूमिका त्यांचा मुलगा माली साकारतोय.
८३ मध्ये रणवीर सिंग कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट १० एप्रिल ला प्रदर्शित होतोय.