News Marathi

विकून टाकचे 'दादाचं लगीन' गाणं – शिवराज वायचळ लग्न करायला आहेत तयार

नंदेश उमप यांनी साधारण चाल वाटणाऱ्या गाण्याला त्यांच्या जोशील्या आणि गमतीशीर आवाजाने उठावदार केले आहे.

भारतीय कुटुंबपद्धतीमध्ये लग्न हा एक सोहळा असतो ज्यात सगळे नातेवाईक आपला रुसवा फुसवा मागे ठेऊन एका छताखाली जमतात. समीर पाटील यांच्या आगामी विकून टाक या चित्रपटातील 'दादाचं लगीन' या नवीन गाण्यात हाच सोहळा बघायला मिळतोय.

गाण्याची सुरुवात हळदी समारंभाच्या तयारीने होते. शिवराज वायचळ यांची व्यक्तिरेखा गाण्याच्या केंद्रस्थानी आहे.

घरात लग्न असताना जो आनंद उत्सव सगळीकडे असतो, त्याचं पुरेपूर चित्रण या गाण्यात दिसतं. गाण्याच्या प्रॉडक्शन डिझाईन मध्ये वास्तवातील लग्नाच्या तयारीचा भास होतो, इतकं ते खरं वाटतंय. प्रत्येक कलाकाराने मिळालेल्या संधीचा भरपूर उपयोग करत गाण्यात मजा आणलय.

नंदेश उमप यांनी हे गाणं गायलय. उमप यांचा आवाज तसा सहज ओळखण्यासारखा आहे, पण या गाण्यात त्यांनी आपल्या आवाजात बदल करत गाण्याच्या रूपाशी एकरूप होणाऱ्या आवाजात हे गाणं सादर केलय.

उमप या ठिकाणी पूर्ण जोशात दिसताहेत. गाण्याची धून तशी साधारण असली तरी अमितराज यांनी तालवाद्यांचा भरपूर वापर करत या कमतरतेकडे दुर्लक्ष करायला भाग पाडलय. गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गमतीशीर गाण्याने गाणे ऐकण्यात आणखी मजा येते.

'दादाचं लगीन' गाणं येथे पहा आणि आम्हाला सांगा कि तुम्हाला विकून टाक हा चित्रपट बघायला आवडेल का?