{ Page-Title / Story-Title }

News Marathi

कोर्टचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेंचा पुढील चित्रपट पूर्ण

Read in: English


भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित या चित्रपटाचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही.

Keyur Seta

सर्वत्र भरपूर कौतुक मिळवलेला आणि भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत निवड झालेला कोर्ट (२०१५) या चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे पुढे कोणता चित्रपट करतील याकडे सर्वांचे लक्ष होते. सिनेस्तानशी बोलताना त्यांनी सांगितले कि भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित असलेला त्यांचा पुढील चित्रपट नुकताच पूर्ण झालाय.

"मी नुकताच हा चित्रपट पूर्ण केलाय," ताम्हाणे म्हणाले. त्यांच्या या चित्रपटाचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही. पण कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीमुळे सध्या ताम्हाणेंच्या या चित्रपटासोबत जगातील सगळ्याच चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. "आम्ही ज्या काही योजना आखल्या होत्या त्या सगळ्याच व्यर्थ ठरल्या आहेत," ताम्हाणे म्हणाले. "सगळे चित्रपट महोत्सव सुद्धा रद्द होत आहेत. संपूर्ण जगच लॉकडाऊन मध्ये आहे."

प्रदर्शनासंबंधी ताम्हाणे म्हणाले, "या वर्षाअखेरीपर्यंत चित्रपट प्रदर्शनास सज्ज होईल अशी आशा आहे. नाही तर पुढच्या वर्षी."

ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत निवड होण्याखेरीज कोर्टने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. ६२व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोर्ट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ताम्हाणे म्हणतात कि कोर्टमुळे त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी मार्ग खुला झाला. "लोकांनी कोर्ट पाहिला होता, त्यामुळे यावेळी मला गंभीरतेने घेणं त्यांना फार कठीण गेलं नाही," ते म्हणाले.

कोर्टमध्ये सत्र न्यायालयात ज्या पद्धतीने कामकाज चालते त्याची वास्तविक मांडणी होती. त्यांचा पुढील चित्रपट हा मुख्य प्रवाहातील चित्रपट असेल का, असे विचारल्यावर ते म्हणाले, "मी चित्रपटांना मुख्य प्रवाहातील आहेत कि नाहीत अशा वर्गीकरणातून बघत नाही. मला जे समजलं आणि भावलं ते मी केलं. मला वाटतं हे लोकांनी ठरवावं कि हे मुख्य प्रवाहातील आहे कि नाही. तसं वाटावं म्हणून मी वेगळ्या वाटेने जाऊन काही केलेलं नाही."

Related topics