हा चित्रपट एप्रिल मध्ये रिलीज होणार होता, परंतु आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने त्याच्यावर निवडणूक संपेपर्यंत बंदी घातली होती.
पीएम नरेंद्र मोदी आता २४ मे ला रिलीज होणार
मुंबई - 03 May 2019 11:34 IST
Updated : 18:14 IST
Keyur Seta
ओमंग कुमार बी दिग्दर्शित पीएम नरेंद्र मोदी आता शेवटी २४ मे ला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी ही बातमी दिली.
हा चित्रपट अगोदर एप्रिल मध्येच रिलीज होणार होता, परंतु आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता निवडणूक आयोगाने त्याच्या रिलीजवर निवडणूक संपेपर्यंत बंदी घातली होती.
निर्मात्यांनी निवडणूक आयोगाच्या निणर्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला संपूर्ण चित्रपट पाहून त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने १९ मे पर्यंत बंदी कायम ठेवण्याचा निर्णय अबाधित ठेवला.
संदीप सिंह म्हणाले, "भारताचे एक चांगले नागरिक या नात्याने आम्ही भारतीय न्यायालयाचा मान ठेवला आहे. चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता लक्षात घेता निवडणूक संपल्यानंतर लगेच २४ मे ला आम्ही हा चित्रपट रिलीज करणार आहोत."
निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे निर्माते निवडणुकीच्या कालावधीत चित्रपटाचे प्रमोशन करू शकणार नाहीत, त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर प्रमोशनसाठी त्यांच्याकडे फक्त ४ दिवस उरतात. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सुद्धा युट्युबवरून हटवण्यात आली आहेत.
"फक्त ४ दिवसांच्या प्रमोशन नंतर चित्रपट रिलीज करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल," संदीप सिंह म्हणाले.
पीएम नरेंद्र मोदी मध्ये विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसतील तर मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत दिसतील.
Related topics