दिग्गज ऍक्शन डिरेक्टर आणि चित्रपटकर्ते वीरू देवगण यांचे २७ मे ला मुंबईमध्ये निधन झाले. प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांना २७ मे ला सकाळी सांताक्रूझच्या सूर्या इस्पितळामध्ये दाखल केले होते. तेथेच त्यांचा ह्रिदयक्रिया बंद झाल्याने मृत्यू झाला.
वीरू देवगण १९५७ ला अभिनेता बनण्यासाठी अमृतसर वरून मुंबईला आले होते. पुढे त्यांनी ८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये ऍक्शन डिरेक्टर म्हणून काम केले. अगोदर स्टंटमॅन म्हणून काम करत असताना त्यांना रोटी कपडा और मकान (१९७४) साठी ऍक्शन डिरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नंतर त्यांनी खेल खेल में (१९७५), लहू के दो रंग (१९७९), नमक हलाल (१९८२) आणि मिस्टर इंडिया (१९८७) साठी ऍक्शन डिरेक्टर म्हणून काम केले.
देवगण यांनी नट विकी आणि सनी कौशल यांचे वडील शाम कौशल तसेच नावाजलेले दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना सुद्धा इंडस्ट्रीमध्ये आपले पाय जमवायला मदत केली.
वीरू देवगण यांनी आपला पुत्र अजय ला फूल और कांटे (१९९१) चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करवून दिले.
अजय देवगण, अमिताभ बच्चन, मनीषा कोईराला आणि सुश्मिता सेन यांना घेऊन त्यांनी हिंदुस्तान की कसम (१९९९) हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याच वर्षी त्यांनी दिल क्या करे या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात अजय देवगण, काजोल आणि महिमा चौधरी यांची प्रमुख भूमिका होती.
२७ मे ला सांताक्रूझला संध्याकाळी ६ वाजता वीरू देवगण यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे त्यांची पत्नी वीना आणि चार मुलं आहेत.