{ Page-Title / Story-Title }

Article Hindi

छोटा भीम कंग फू धमाका रिव्ह्यू – लोकप्रिय ऍनिमेटेड पात्रांची चीनमध्ये धमाल

Read in: English


ऍनिमेशनचा दर्जा सुधारला असला तरी कमजोर पटकथेमुळे आपली निराशा होते.

Sonal Pandya

छोटा भीम फ्रँचाइज मधल्या या नवीन चित्रपटात चीन चा राजा जियान आणि त्याची मुलगी किया यांना त्यांचा राज्यात शांती निर्माण करण्यास छोटा भीम आणि त्याचे मित्र मदत करतात.

राज्यामध्ये कंग फू ची आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा भरवण्यात आली आहे आणि रशिया,आफ्रिका अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून स्पर्धक या स्पर्धेत भाग घ्यायला आले आहेत. छोटा भीम आणि त्याचे मित्रसुद्धा या स्पर्धेत भाग घेतात.

किया आणि तिचा कंग फू शिकणारा मित्र मिंग छोटा भीम व त्याच्या मित्रांना राजवाड्यात बोलवतात. तिथे त्यांची चांगली मैत्री होते. स्पर्धेच्या दुसऱ्या राउंड मध्ये अचानक राजा जियानचा पुतण्या झुहू तिथे येतो आणि राजकन्या किया चे अपहरण करतो. त्याला स्वतःला राजा बनायचे असते.

राजकन्या किया आणि एक जादुई ड्रॅगन यांच्यामध्ये एक कनेक्शन आहे. झुहू ला त्या जादुई ड्रॅगनच्या सर्व शक्ती हव्या आहेत म्हणून तो राजकन्येचा अपहरण करतो. ड्रॅगन ची जादुई शक्ती मिळाल्यानंतर त्याला संपूर्ण चीनवर ताबा मिळवायचा आहे. पण भीम आणि त्याचे मित्र कियाला झुहूच्या तावडीतून सोवडवून आणायचा निश्चय करतात.

राजीव चिलका आणि विनायक दास दिग्दर्शित या चित्रपटातील ऍनिमेशन भारतातील इतर ऍनिमेटेड चित्रपटांच्या तुलनेने उजवे आहे. ऍनिमेटेड सेट्स आणि ऍक्शन ३डी तंत्रज्ञानामुळे आणखी उठून दिसतात. ३डी तंत्रज्ञामुळे सर्व पात्रांच्या ऍनिमेशनमध्ये सुद्धा थोडे बदल केले आहेत.

राजू, चुटकी, कालिया आणि ढोलू-भोलू या सर्वांच्या वाट्याला महत्वाचे सीन्स आले आहेत.

तरीदेखील चित्रपटात काही तांत्रिक चुका आहेत, जसे हलत्या कॅमेऱ्याचा अतीवापर. ३डी चा वापर कुठे आणि किती प्रमाणात करावा हे ठाऊक असणे देखील तितकेच महत्वाचे असते. परंतु इथे तसे घडताना दिसत नाही.

सर्व पात्रांचे ऍनिमेशन उत्तम दर्जाचे झाले असले तरी त्यांचे लिप-सिंक करताना मात्र खूप सीन्समध्ये गोंधळ झाला आहे. विनाकारण चित्रपटात गाणी टाकण्याचा मोह सुद्धा आवरायला हवा होता.

पण आपली सगळ्यात जास्त निराशा होते कमजोर पटकथेमुळे. निधी आनंद आणि तेजा यांचे संवाद सुद्धा फिके आहेत. संवादातून विनोदनिर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुद्धा फसला आहे. पटकथेमध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या.

आपण पाश्चिमात्य देशातल्या ऍनिमेशन चित्रपटांकडून प्रेरणा घेऊन तांत्रिक गोष्टी उत्तम करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचबरोबर स्टोरीटेलिंग वर देखील आपण तितकाच भर द्यायला हवा. तरीही तुम्ही जर छोटा भीम चे फॅन असाल तर तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल.

Related topics