भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनलेल्या जीवनपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट एक आठवडा अगोदर, म्हणजे ५ एप्रिल ला, रिलीज करण्याचे ठरवले आहे. पीएम नरेंद्र मोदी असे शीर्षक असलेला हा चित्रपट या अगोदर १२ एप्रिल ला रिलीज होणार होता.
या रिलीज डेट वर मीडियाच्या अनेक लोकांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट रिलीज करणे चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. पण नवीन रिलीज डेट सुद्धा आचारसंहितेच्या कालावधीतलीच आहे.
पण निर्माते संदीप सिंह म्हणाले की त्यांनी चित्रपट एक आठवडा अगोदर रिलीज करण्याचे कारण म्हणजे विवेक ओबेरॉय चे नुकतेच रिलीज केलेले ९ वेगवेगळे लूक्सला मिळालेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.
"आम्ही पब्लिक डिमांड वर चित्रपट एक आठवडा अगोदर रिलीज करण्याचे ठरवले आहे. प्रेक्षकांनी एक आठवडा अजून वाट पाहायला लागू नये अशी आमची इच्छा आहे. १३० कोटी जनतेची ही गोष्ट आहे आणि मी त्यांना लवकरात लवकर हा चित्रपट दाखवू इच्छितो," असे सिंह म्हणाले.
निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये विवेक ओबेरॉय तिरंग्याच्या रंगात कपडे घातलेले मुलांच्या घोळक्यात उभे दिसतात.
उमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या अगोदर त्यांनी मेरी कॉम (२०१४) आणि सरबजीत (२०१६) सारखे जीवनपटांचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटाची सह-निर्मिती विवेक ओबेरॉयचे वडील आणि दिग्गज अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी केली आहे. चित्रपटात बरखा बिश्त सेनगुप्ता मोदींच्या पत्नी जशोदाबेन च्या भूमिकेत दिसतील. बमन इराणी उद्योगपती रतन टाटा तर मनोज जोशी अमित शाह च्या भूमिकेत दिसतील.