News Marathi

अजरामर मराठी गाणे 'अश्विनी ये ना' चे रीमिक्स आता ये रे ये रे पैसा २ मध्ये पाहायला मिळेल

ओरिजिनल गाणे अशोक सराफ आई चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित केले होते तर किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गाण्याला आवाज दिला होता.

सचिन पिळगावकर दिग्दर्शित गम्मत जम्मत (१९८७) मधील 'अश्विनी ये ना' हे गाणे प्रेक्षकांच्या मनात अजून ताजे आहे. अनिल-अरूण ह्यांच्या संगीत दिग्दर्शनात किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल ह्यांच्या गायकीसोबतच अशोक सराफ आणि चारुशीला साबळे ह्यांचा डान्स अजून आपल्याला हसायला भाग पाडतो.

आता दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या ये रे ये रे पैसा साठी या गाण्याचे रीमिक्स केले आहे. हिंदी चित्रपसृष्टीतील जुनी गाणी रीमिक्स करण्याचा ट्रेंड आता मराठी चित्रपसृष्टीत सुद्धा आला आहे असं म्हणायला हरकत नाही.

ओरिजिनल गाणे घरामध्ये चित्रित केले होते. एकीकडे सराफ एका खोलीत नाचत असतात तर दुसरीकडे साबळे दुसऱ्या घरात नाचत असतात. पण रीमिक्स गाणे मात्र एका चकचकीत बार मध्ये शूट केले आहे. या गाण्यात संजय नार्वेकर, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, मृण्मयी गोडबोले, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, आनंद इंगळे आणि स्मिता गोंदकर सर्वजण नाचताना दिसतात.

क्लब मध्ये वाजवले जाणारे थिरकायला लावणारे म्युजिक जरी असले तरी जुन्या गाण्याचा आत्मा तसाच ठेवण्यात संगीतकार यशसवी झाले आहेत. जुन्या गाण्याला ट्रिब्यूट म्हणून या गाण्यात कलाकार हातात झाडू घेऊन सुद्धा नाचताना दिसतात. परंतु सराफ आणि साबळे यांच्या इतका प्रभाव ते पाडू शकलेले नाहीत.

किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी जुन्या गाण्याला आवाज दिला होता तर ट्रॉय ने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी आवाज दिला आहे. गुप्ते यांनी गाण्याला आवश्यक असणारी एनर्जी योग्य पकडली आहे परंतु कऱ्हाडे यांच्या वाट्याला मात्र फक्त एकच ओळ आली आहे.

ये रे ये रे पैसा २ ऑगस्ट ९ला रिलीज होईल.