मराठी चित्रपट बाबा (२०१९) ची निर्मिती करून संजय दत्त ह्यांनी निर्मिती क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. प्रख्यात चरित्र अभिनेते दीपक डोब्रियाल या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.
बाबाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान संजय दत्त ह्यांनी त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे उद्देश काय असेल या विषयी सांगितले, "आम्हाला आशयघन चित्रपट बनवायचे आहेत पण त्याचबरोबर मनोरंजनाला देखील आम्ही तितकेच महत्व देणार. आशय महत्वाचा असतोच पण त्याच सोबत चित्रपट मनोरंजक सुद्धा असायला हवा."
संजय दत्त ह्यांना सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वजण 'बाबा' म्हणून हाक मारतात, परंतु त्यांच्या पहिल्या निर्मितीचे शीर्षक बाबा असणे हा निव्वळ योगायोग आहे असं ते म्हणाले. "दिग्दर्शक राज गुप्ता ह्यांनी हे नाव सुचवले आणि माझ्यासाठी हा सुखद धक्का होता," असे ते म्हणाले.
हिंदी सिनेमातल्या भूमिकांविषयी बोलताना दत्त म्हणाले की त्यांना आता चरित्र भूमिका साकारायच्या आहेत. "मला माहिती आहे की मी या वयात मुलींसोबत झाडांभोवती नाचू शकत नाही, पण मला मेल गिब्सन आणि डेन्झेल वॉशिंग्टन यांच्या सारख्या भूमिका साकारायला आवडतील."
राज कुमार हिरानी ह्यांच्या मुन्ना भाई सिरीज मधील पुढील चित्रपटाची चर्चा कित्येक वर्षांपासून होत आहे. पहिला चित्रपट २००३ ला रिलीज झाला तर दुसरा २००६ ला रिलीज झाला. तिसरा चित्रपट बनवला जाईल का या प्रश्नाला उत्तर देताना संजय दत्त म्हणाले, "मी देवाजवळ प्रार्थना करतो की लवकरात लवकर तसे होऊ दे. पण हा प्रश्न तुम्ही राजू हिरानीला विचारावा, ते नक्कीच उत्तर देऊ शकतील. तुमच्याप्रमाणे मीसुद्धा वाट पाहतोय."
बाबा २ ऑगस्टला रिलीज होईल.