एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटाच्या टायटल ट्रॅक विषयी बोलताना निर्माते विधू विनोद चोप्डा म्हणाले की ट्रॅक निवडण्या अगोदर त्यांनी रोचक कोहलीचे गाण्याचे २० ते २५ वर्जन्स नाकारले.
कोहली ने १९४२ – अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील 'एक लडकी को देखा' या गाण्याच्या चालीवर नवीन गाणे तयार केले आहे.
कोहलींच्या नवीन गाण्याची प्रशंसा करताना अनिल कपूर म्हणाले, "हे एक संस्मरणीय आणि लोकप्रिय गाणे आहे आणि रोचकने खूप सुंदर संगीत दिले आहे. मला रिमिक्स शब्दच आवडत नाही. कोहलीने अगोदरच लोकप्रिय असलेल्या गाण्याचा आत्मा तोच ठेवून नवीन गाणे तयार केले आहे."
निर्माते विधू विनोद चोप्डा म्हणाले की हे ट्रॅक निवडण्या अगोदर कोहलीने २० ते २५ वर्जन्स बनवले होते. "याचे कारण हे की मी जेव्हापण ते गाणे ऐकत असे मला आर डी बर्मन आणि जावेद अख्तर साहेबांची आठवण येत असे. जावेद अख्तरजींनी हे गाणे कारमध्ये लिडो स्टुडिओ मध्ये जाताना लिहले."
ओरिजिनल गाण्याविषयी बोलताना चोप्डा म्हणाले, "अगोदर चित्रपटामध्ये हे गाणे नव्हते, परंतु जावेदजींचा आग्रह होता की हे गाणे हवे. मग मी त्यांना सांगतिले की मी हे गाणे चित्रपटात वापरणार नाही तरीही गाणे लिह्ण्याबाबत ते आग्रही होते.
"त्यानंतर अचानक आम्ही जेव्हा हे गाणे चित्रपटात वापरण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी गाणे पूर्ण लिहले नव्हते. जैसे खिलता गुलाब / जैसे शायर का ख्वाब असे वर्णनात्मक शब्द लिहण्याची कल्पना देखील जावेदजींचीच होती आणि तिथल्या तिथेच बर्मन यांनी त्याला संगीत दिले!"
"हे संपूर्ण गाणे अगदी ५-६ मिनिटमध्ये बनले म्हणूनच मी रोचकला गाण्यातला अगदी छोटासा भाग घेण्यास सांगितला. आणि रोचकने खूपच उत्कृष्ट काम केले आहे," असे चोप्डा म्हणाले.
१९४२ – अ लव्ह स्टोरी हा आर डी बर्मनचा शेवटचा चित्रपट होता. ४ जानेवारी १९९४ ला चित्रपट रिलीज होण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट संगीतकार हा मरणोत्तर फिल्मफेर पुरस्कार मिळाला.
१९९० च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. त्या काळात आर डी बर्मन यांना संगीतकार म्हणून असुरक्षित वाटू लागले होते. चोप्डा पुढे म्हणाले, "असुरक्षिततेची भावना एका महान कलाकाराला देखील असू शकते आणि त्याचा त्याला कसा त्रास होतो हे रोचक तू पण ऐकावं अशी माझी इच्छा आहे.
"जेव्हा आर डी बर्मन यांनी हे गाणे संगीतबद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला कॉल करून सांगतिले की आपण गाण्यामध्ये व्हायोलिन वापरायला हवे. त्यांचा नोकर सुदामाने गाणे ऐकल्यावर त्यांना म्हटले होते की गाण्यात वाद्ये नाहीत त्यामुळे ते नर्व्हस झाले होते.
"मला असे वाटू लागले की नर्व्हसनेसमध्ये कदाचित ते गाणे बिघडवतील, म्हणून मी त्यांना सांगतिले की गाण्यात अनिल कपूर सायकल चालवतानाचे, सायकलची बेल वाजवण्याचे असे काही आवाज असणार आहेत, असं मला त्यांना खोटं सांगावं लागलं.
"महान कलाकाराने कधीच त्याच्या टॅलेंट वर शंका घेऊ नये. जसा हा चित्रपट देखील आम्ही सर्वांनी खूप चांगल्या हेतूने मनापासून बनवला आहे. तुम्हाला हा चित्रपट आवडला तर आम्हा सर्वांना खूप आनंद होईल आणि नाही आवडला तर आम्ही अजून एक चित्रपट बनवू."
एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटात सोनम कपूर अहुजा, राजकुमार राव व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ फेब्रुवारीला चित्रपट रिलीज होईल.