News Marathi

भीमसेन जोशी यांच्या मुलाचा भाई चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप. महेश मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम

भाई – व्यक्ती की वल्ली चित्रपटातील भीमसेन जोशी, पु ल देशपांडे आणि वसंतराव देशपांडे सर्व मिळून दारू पिण्यासाठी शास्त्रीय गायिका हिराबाई बरोडेकर यांच्या घरी जाण्याच्या दृश्यावर श्रीनिवास जोशी यांनी आक्षेप घेतला आहे.

पु ल देशपांडे यांचा जीवनपट भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटातील काही दृश्यांमुळे शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. परंतू मांजरेकर मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत असे त्यांनीच आम्हाला सांगितले.

भाई – व्यक्ती की वल्ली चित्रपटात शास्त्रीय संगीतातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे जे चित्रण केले आहे त्यावर भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी नाराजी दर्शवली आहे.

भीमसेन जोशी, पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे दारूच्या शोधात शास्त्रीय गायिका हिराबाई बरोडेकर यांच्या घरी पोचतात, चित्रपटात असे एक दृश्य आहे. दृश्यामध्ये भीमसेन जोशींना जरी प्रत्यक्ष दारू पिताना दाखवले नसले तरी श्रीनिवास यांचा आक्षेप ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बरोडेकर यांच्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या चित्रणावर आहे.

सिनेस्तानशी बोलताना श्रीनिवास म्हणाले, "त्या खूप ज्येष्ठ होत्या आणि त्यांच्या घरी दारू कधीच नसे. माझ्या वडिलांसाठी त्या आईच्या स्थानी होत्या. अशी घटना मुळात कधी घडलीच नव्हती, आणि ह्या दृश्यामुळे हिराबाई यांची इमेज खराब होते."

ते पुढे म्हणाले की त्यांचे चित्रपटाबाबतीत इतरही काही आक्षेप होते, परंतू कलाकाराला कलात्मक स्वातंत्र्य असायला हवे म्हणून मी त्यांकडे दुर्लक्ष केले, "परंतू कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली जे कधी घडलेच नाही ते तुम्ही कसे काय दाखवू शकता"?

श्रीनिवास यांचे निर्मात्यांशी या विषयावर अजून बोलणे झाली नाही. "चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाले, लाखो लोकांनी तो पहिला देखील. त्यामुळे आता यावर काहीच होऊ शकत नाही.

आम्ही मांजरेकरांशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, "आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत."

पु ल देशपांडे आणि त्यांची पत्नी सुनीता देशपांडे यांच्या भूमिका सागर देशमुख आणि इरावर्ती हर्षे यांनी साकारल्या आहेत.

चित्रपटाचा पहिला भाग ४ जानेवारीला रिलीज झाला असून प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा देखील त्याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.

भाई – व्यक्ती की वल्ली चा दुसरा भाग ८ फेब्रुवारी २०१९ ला रिलीज होणार आहे.