News Marathi

पिफ २०१९: चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर, राम लक्ष्मण यांचा सत्कार

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या १७ व्या पर्वाच्या उद्घाटन समारंभात रोहिणी हट्टंगडी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

काल  १० जानेवारी २०१९ ला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मान्यवरांच्या उपस्थित हाऊसफुल्ल सुरवात झाली. महात्मा गांधींच्या १५०वी जयंती वर्षाच्या निमित्ताने महोत्सवाची थीम  'इन सर्च ऑफ ट्रूथ' (सत्याच्या शोधात) अशी ठेवण्यात आली होती.

रोहिणी हट्टंगडी यांना रिचर्ड अटेनबरो यांच्या गांधी (१९८२) चित्रपटात कस्तुरबा गांधीच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा बाफ्ता (ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म्स अँड टेलीविजन आर्टस्) हा पुरस्कार मिळाला होता म्हणून त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.

"फक्त आठ दिवसांपूर्वीच जब्बार पटेल यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती केली. मी पुण्यात जन्मली आणि मोठी झाली, मी पुण्यात नाटके देखील केली. गेल्या सतरा वर्षांपासून हा महोत्सव चालू आहे तरी या महोत्सवाला येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आणि माझ्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होत आहे याचा मला खूप आनंद आहे," असे हट्टंगडी समारंभात म्हणाल्या.

निवेदक सुमित राघवन यांनी त्यांच्या विनोदी शैलीत सर्वांना हसवत वातावरण विनोदी ठेवले. त्यांच्याबरोबर क्षितिज दाते हे सहाय्यक निवेदक होते. 

संगीत दिग्दर्शक राम लक्ष्मण यांना मराठी आणि हिंदी सिनेमातील संगीत क्षेत्रातील योगदानासाठी एस डी बर्मन पुरस्कार देण्यात आला. लक्ष्मण पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर येताच त्यांचे टाळ्यांचा गडगडाटात स्वागत करण्यात आले.

दिग्गज अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर आणि प्रसिद्ध फिल्ममेकर गोविंद निहलानी यांना भारतीय सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

महोत्सवाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी ज्युरी मेम्बर्सची ओळख करून दिली. ज्यामध्ये कन्नड, तामिळ, तेलगू चित्रपटांचे एडिटर बी लेनिन, लेखक कमलेश पांडे, स्वीडिश अभिनेते-दिग्दर्शक ख्रिस्तोफर हॉल्मग्रेन, जर्मन कॉस्च्युम डिझायनर डॅनियल कियांचीओ, इस्राईली दिग्दर्शक जोसेफ इस्राईल लबान, श्रीलंकन दिग्दर्शक प्रसन्ना विठाणगे आणि इराणि दिग्दर्शक शबनम गोलीखानी यांचा समावेश आहे.

पटेल म्हणाले, "गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी चित्रपटांची संख्या खूप जास्त होती, त्यामुळे सिलेक्शन कमिटीचे काम खूपच कठीण होते. गेल्या वर्षी १,२०० चित्रपट होते तर ह्यावर्षी जगभरटीला १०४ देशांतून १,६३४ एन्ट्री आल्या होत्या.

१७ जानेवारीपर्यंत पिफ चालू असणार आहे.