डिजिटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स कडे आजकाल अनेक निर्माते आकर्षित होत आहेत. शाहरुख खान च्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने या अगोदर बिलाल सिद्दीकी च्या पुस्तकावर आधारित बार्ड ऑफ ब्लड या वेब-सिरीज ची घोषणा केली होती.
आता नेटफ्लिक्स ने प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक हुसैन झैदी यांच्या कधीच प्रकाशित न झालेल्या क्लास ऑफ ८३ या पुस्तकावर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याचे दिग्दर्शन अतुल सभरवाल करणार आहेत.
प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले, "रेड चिलीज नेटफ्लिक्स साठी क्लास ऑफ ८३ या पुस्तकावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहे. कास्टिंग बद्दल जास्त ठाऊक नाही पण प्रोजेक्टची बऱ्यापैकी तयारी झाली आहे. दिग्दर्शकाची सुद्धा निवड झाली आहे. अतुल सभरवाल हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत."
सभरवाल शी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते म्हणाले, "मी यावर काहीच बोलू शकत नाही. मला हे देखील ठाऊक नाही की मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे की नाही."
त्यांना नेटफ्लिक्स चा चित्रपट दिग्दर्शन करण्याची ऑफर आले का असं विचारल्यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. सभरवाल यांनी या अगोदर औरंगझेब (२०१३) चित्रपट आणि पावडर या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.
क्लास ऑफ ८३ हे पुस्तक १९८० च्या दशकात मुंबई मध्ये अंडरवरल्ड गँग्स चा सामना करण्यासाठी सुरु केलेल्या पोलीस च्या स्पेशल एन्काउंटर टीम च्या कारवायां वर आधारित आहे.
या अगोदर नेटफ्लिक्स ने काही निर्मात्यां बरोबर ८ ओरिजिनल चित्रपटांची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. प्रियांका चोपडा, अनुष्का शर्मा आणि माधुरी दीक्षित या अभिनेत्री त्या निर्मात्यांपैकी आहेत.
प्रियांका चोपडांचा फायरब्रॅन्ड नेटफ्लिक्स वर रिलीज झाला आहे तर माधुरी दीक्षित निर्मित मराठी चित्रपट १५ ऑगस्ट आणि अनुष्का शर्मा निर्मित हिंदी हॉरर चित्रपट बुलबुल लवकरच रिलीज होणार आहेत.