News Hindi

कंगना रनौत ने डमी घोड्यावर बसून शूट केलेल्या दृश्याबद्दल स्टंट डिरेक्टर म्हणतात की ही सामान्य गोष्ट आहे

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (२०१९) च्या दृश्यांमध्ये खोट्या घोड्याचा वापर केल्याचे कळताच लोकं कंगना रनौतची खिल्ली उडवायला लागली.

गेल्या आठवडाभर कंगना रनौतच्या मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (२०१९) च्या दृशां मध्ये खोट्या घोड्याचा वापर केल्याचा विडीओ सोशल मीडिया आणि व्हाट्सएप वर फिरत होता.

विडिओ मध्ये कंगना आपल्याला एक ऍक्शन दृश्य शूट करण्यासाठी खोट्या म्हणजेच डमी घोड्याचा वापर करताना दिसत आहेत. अनेकांसाठी हा विडिओ मनोरंजनाचे कारण होता आणि कंगनाला खोटा घोडा वापरण्यासाठी नेटकऱ्यानी सोशल मीडियावर खूप ट्रोल सुद्धा केले.

परंतू हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक ऍक्शन डिरेक्टरांच्या मते आजकाल सर्वच चित्रपटांमध्ये घोडेस्वारीची दृशे याच पद्धतीने शूट केली जातात.

प्रख्यात ऍक्शन डिरेक्टर एलन अमीन यांनी सिनेस्तान ला सांगितले की "ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. समजा तो अभिनेता किंवा अभिनेत्री घोड्यावरून खाली पडून जखमी झाली तर पूर्ण शूटिंग थांबते. अभिनेता घोड्यावरून खाली पडणे ही खूप धोकादायक गोष्ट आहे. आपण हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. तलवारबाजी आणि इतर फायटिंग ची दृशे त्या मानाने सोप्पी असतात."

डमी घोडा त्यांनी देखील या अगोदर वापरला आहे. ते म्हणाले, "मी देखील माझ्या काही चित्रपटांमध्ये डमी घोडा वापरला आहे. हॉलिवूड मध्ये सुद्धा हेच केले जाते. जर तुम्ही अगदीच उत्कृष्ट घोडेस्वार नसाल तर आजकाल कोणीही खऱ्या घोड्यावर बसून शूट करत नाही."

दिग्गज ऍक्शन डिरेक्टर शाम कौशल ज्यांनी पद्मावत (२०१८) आणि बाजीराव मस्तानी (२०१५) या चित्रपटांतील घोडेस्वारीची दृशे कोरिओग्राफ केली होती त्यांनी सुद्धा हेच म्हटले. "पडद्यावर आणखी इम्पॅक्टफुल दिसण्यासाठी आम्ही या क्लुप्त्या लढवतो. पडद्यावर दिसताना ते थरारक आणि उत्कंठावर्धक दिसायला हवे पण यासाठी कलाकार अथवा स्टंटमॅनचा जीव धोक्यात घालण्याची गरज नसते. त्यासाठीच अनेक नवनवीन गोष्टी विकसित केल्या आहेत. पडद्यावर दिसताना लोकांना ते खरे वाटले पाहिजे हाच एक उद्देश असतो," असं कौशल म्हणाले.

हेच समजावण्यासाठी त्यांनी काही उदाहरणे देखील दिली. "आपण एखाद्याला उडताना दाखवताना हार्नेसचा वापर करतो, जमिनीवर आपटताना आपण क्रॅश मॅटचा वापर करतो, शेवटी याचा उद्देश हाच असतो की प्रेक्षकांना पडद्यावर पाहताना ते उत्कंठावर्धक वाटायला हवे आणि त्याच बरोबर स्टंटमॅनला सुद्धा कोणतीही इजा नाही झाली पाहिजे. आणि हे जितक्या सोप्प्या पद्धतीने करता येईल तेवढं चांगलं. आम्ही एक काल्पनिक विश्व तयार करतो. दररोज नवनवीन गोष्टी विकसित केल्या जात आहेत."

शाम कौशल 

कौशल पुढे म्हणाले की तंत्रज्ञानामुळे गोष्टी किती सोप्या झाल्या आहेत आणि आपण यासाठी आभारी असायला हवे. "आज वी एफ एक्स च्या मदतीने आपण एका व्यक्तीला उंच पर्वतावर उभा नसताना देखील तो पर्वतावर उभा आहे असं दाखवू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती आगीत होरपळताना दाखवतात तेव्हा तो खरंच आगीत होरपळत नसतो. ज्यांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे त्या सर्वांना माझा सॅल्यूट आहे."

कौशल, ज्यांचा मुलगा विकी कौशल सध्या बॉलीवूडचा चाहता अभिनेता आहे, त्यांच्या मते कोणाही कलाकाराला असं ट्रोल करणं चुकीचं आहे. "त्यात हसण्यासारखं काहीच नाही. उदाहरणार्थ कधी कधी एखादा संवाद बोलण्यासाठी १० रिटेक्स द्यावे लागतात, कधी कधी अभिनेते रडण्यासाठी ग्लिसरीन वापरतात तर कधी वापर नाही करत, जर का एखाद्या कलाकाराला मरण्याचा अभिनय करायचा असेल म्हणजेच आपण त्याला विष देऊन मारला पाहिजे असा त्याचा अर्थ नसतो. जेव्हा चित्रपटात एखाद्याला तलवारीने भोसकून मारतात तेव्हा खरोखर त्याला तलवारीने भोसकले पाहिजे असं नाही. लोकांनी देखील समजायला हवं की हे एक आभासी जग आहे."

कौशल म्हणाले इंडस्ट्रीमध्ये काही कलाकार आहेत जे उत्तम घोडेस्वारी करू शकतात पण त्यांनी त्यांची नावे सांगण्यास मात्र नकार दिला.