दिग्गज चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्यांचे गेल्या आठवड्यात मुंबई मध्ये निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांना काही वेळासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते.
राजकुमार बडजात्या राजश्री प्रोडक्शनचे एमडी (मॅनेजिंग डायरेक्टर) होते. १४ मे १९४१ ला त्यांचा जन्म झाला होता. राजबाबू या नावाने ओळखले जाणाऱ्या बडजात्यांचा राजश्री प्रोडक्शन हाऊसच्या निर्माण मध्ये महत्वाचा वाटा होता.
कमल कुमार बडजात्या राजश्री प्रोडक्शनचे एमडी आणि राजकुमार बडजात्यांचे भाऊ यांच्याशी झालेल्या चर्चे मध्ये त्यांनी आम्हाला त्यांचे वडील ताराचंद्र बडजात्या यांनी राजश्री प्रोडक्शन हाऊस ची स्थापना कशी केली याचा किस्सा सांगितला.
त्यांचे वडील चमारिया टॉकी या दक्षिण भारतीय वितरण कंपनीत कामाला होते. ही कंपनी तोट्यात गेली होती. ताराचंद बडजात्यांनी कंपनीला पुन्हा उभे केले.
एस एस वासन यांचा चंद्रलेखा हा तमिळ चित्रपट त्या काळातला सर्वात महाग चित्रपट होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त गाजला नाही. तेव्हा ताराचंद यांनी वासन यांना हा चित्रपट हिंदी मध्ये डब करून संपूर्ण भारतात रिलीज करण्याचा सल्ला दिला.
"माझ्या वडिलांनी त्यांना विश्वास दिला की ते सर्व गोष्टी सांभाळतील. डब व्हर्जन तयार झाल्या नंतर वासन यांनी माझ्या वडिलांवर हा चित्रपट भारतभर रिलीज करण्याची जबाबदारी सोपवली. त्यासाठी माझ्या वडिलांना भारतात ठिकठिकाणी नवीन ऑफिस उघडायला लागले आणि अश्या प्रकारे राजश्री प्रोडक्शनला सुरुवात झाली," असं कमल कुमार म्हणाले.
७०च्या दशकात ताराचंद यांना राजकुमार यांची सुद्धा साथ मिळायला सुरुवात झाली. पिया का घर (१९७२) या चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता म्हणून त्यांनी काम केले. कमल कुमार यांनी आम्हाला सांगितले की राजकुमार यांनी प्रॉडक्शनची काळजी घेतली. त्यांनी क्वचितच कधी इंटरव्यू दिला असेल. ते अगदी साधं जीवन जगत असत.
चित्तचोर (१९७६), सारांश (१९८३) आणि मैने प्यार किया (१९८९) या सारख्या आयकॉनिक चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम केल्यानंतर आपला मुलगा सूरज बडजात्याचा दिग्दर्शकीय प्रयत्न असलेला हम आपके है कौन (१९९४) या चित्रपटापासून त्यांनी निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरु केली.
राजकुमार यांचा निर्माता म्हणून अभिषेक दीक्षित दिग्दर्शित हम चार हा शेवटचा चित्रपट अगदी दोनच आठवड्यांपूर्वी रिलीज झाला.
सलमान खान यांनी राजश्री प्रोडक्शनचा केलेला शेवटचा चित्रपट प्रेम रतन धन पायो (२०१५) च्या प्रमोशन वेळी राजकुमार आपल्या कामा विषयी किती निष्ठावंत आहेत हे सांगितले होते. त्यांनी सांगितले राजकुमार यांची पत्नी सुधा बडजात्या त्यांच्यावर खूप नाराज होत्या कारण त्यांचा मुलगा सूरजच्या जन्माच्या दिवशीच ते कामा निमित्त बाहेर गेले होते.
"जेव्हा सूरजचा जन्म झाला तेव्हा राजकुमार यांना दोस्ती (१९६४) च्या प्रीमियरला जाणे भाग होते, त्यामुळे त्यांची पत्नी त्यांच्यावर नाराज होत्या," असं सलमान खान म्हणाले.